
माती माफियांनी ‘आप’ नेते ग्यासूद्दीन खान यांना धमकावले
उत्खनन व भराव प्रकरणी तक्रार केल्याने जीवे मारण्याची धमकी
राजकीय नेते व ठेकेदारांकडून डंपरने चिरडून टाकण्याचा इशारा* मुख्यमंत्री, गृहमंत्री, आमदार – खासदार, पोलिस अधीक्षक लक्ष देणार का?
खालापूर / विशेष प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील औद्योगिक तालुका…कोकणचे प्रवेशद्वार…मुंबई-पुणे महामार्गांवरील महत्वपूर्ण, ऐतिहासिक तालुका अशी ओळख असलेल्या खालापूर तालुक्याची वाटचाल वेगाने बिहार व बीड जिल्ह्याच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर फोफावू लागली असून पत्रकार, राजकिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सुजाण नागरीक यांचे जगणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. खालापूर तहसील प्रशासनासह उत्खनन व भराव विरोधात आवाज उठविल्यास…रॉयल्टी चोरी रोखण्यासाठी प्रयत्न केल्यास…माती माफियांना आळा घालण्याची मागणी केल्यास शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासह माती माफिया, राजकीय नेते व ठेकेदार यांच्याकडून तक्रारदार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे संपादक फिरोज पिंजारी, साप्ताहीक खालापूर वादळचे मुख्य संपादक तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, साप्ताहीक खालापूर वार्ताचे संपादक सुधीर माने, पत्रकार व आंदोलक राजेंद्र शिवाजी जाधव यांनी खालापूर तहसील कार्यालय तसेच उत्खनन व भरावविरोधात आवाज उठविल्याने त्यांचा जीव धोक्यात असताना आता आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासूद्दीन खान यांना ही माती माफियांकडून धमकाविण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी ग्यासूद्दीन खान यांनी एका ठिकाणी उत्खनन व भराव बेसुमार सुरू असल्याबद्दल मंडळ अधिकारी पानसरे यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच खालापूर तालुक्यात सुरू असलेल्या अनिर्बंध उत्खनन व भरावाबद्दल त्यांनी आवाज उठविल्याने खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील काही राजकिय नेते, त्यांचे पिल्लू तसेच ठेकेदार व माती माफियांकडून ग्यासूद्दीन खान यांना या प्रकरणापासून लांब राहण्याचे सांगत…गरज पडल्यास डंपरने चिरडून टाकू, अशी धमकी देण्यात आली आहे. याबाबत पत्रकारांशी बोलतांना आप नेते ग्यासुद्दीन खान म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मी एक डोंगर पोखरला जात असल्याने त्या भागातील मंडळ अधिकारी यांना फोन करून तक्रार केली होती. 500 ब्रास रॉयल्टी भरून हजारो ब्रास उत्खनन करण्यात येत आहे. दरम्यान, फोन केल्यानंतर काही मिनिटांत समोरून त्याबाबत विचारणा करणारे फोन सुरू झाले. ऐवढेच नव्हे तर आमच्या एका नेत्याकडे फोन करून मला काही माती माफिया व एका राजकिय नेत्याकडून डंपरने चिरडून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.
शासनाचे नुकसान होत असताना आवाज उठविणे गुन्हा झाला आहे का? बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला आहे, आता त्याचा पुढचा अध्याय खालापूर तालुक्यात घडणार आहे का? माझा किंवा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा खून झाल्यावर महसूल प्रशासन…पोलिस प्रशासन जागे होणार का? आता तरी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रायगडच्या मंत्री अदिती तटकरे, भरतशेठ गोगावले, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे, कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे, कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, रायगड पोलिस अधिक्षक, कर्जत प्रातांधिकारी याकडे लक्ष देणार का? कर्जत-खालापूर तालुक्यातील उत्खनन व भराव प्रकरणातील दोषींवर कार्रवाई होणार का? माती माफियांवर अंकुश ठेवला जाणार का? महसूल प्रशासनातील भ्रष्ट्राचारी अधिकारी-कर्मचारी यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी, निवासी नायब तहसिलदार, तहसिलदार यांच्यावर कार्रवाई होईल का? कायदा व सुव्यवस्था बिघडत असताना खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम लक्ष देणार का? रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे खालापूर तालुक्याचा बीड होण्यापासून रोखणार का? असा प्रश्न आम आदमी पार्टीचे खोपोली शहर अध्यक्ष ग्यासूद्दीन खान यांनी उपस्थित केला आहे.
Discussion about this post