
जिल्ह्यात भारी ठरत आहेत पो.नि. पुजारी !!गाजतेय त्यांच्या डी.बी.ची कामगिरी लयभारी !!
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी हे उदगीर येथे रुजू झाल्यापासून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवायला सुरू केला आहे. विशेष करून त्यांनी आपल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला विशेष प्रोत्साहन देऊन, सतत गुंतागुंतीचे गुन्हे शोधण्यात यशस्वी करून दाखवले आहे. कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास कर्मचारी किती उत्साहाने काम करू शकतात. याचे उदाहरण जणू पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दाखवून दिले आहे.गेल्या काही महिन्यात या विशेष पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परवाच वार्षिक तपासणीच्या निमित्ताने विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कौतुक करून त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले होते. त्याचाच परिणाम म्हणून की काय? हे सर्वच कर्मचारी दुप्पट जोमाने कामाला लागले आहेत.सामान्यतः समाजामध्ये असा समज आहे की, गुन्हा घडवून गेला की, आरडा ओरड झाल्यानंतर पोलीस येतात. आणि मग तपासाची प्रक्रिया सुरू होते. उदगीर ग्रामीण पोलिसांनी जनतेचा हा समज मोडीत काढत, गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारी टोळीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी लागणारे साहित्य जसे की, मिरचीची पूड, दोन गुप्त्या, एक तलवार, एक चाकू अशा पद्धतीच्या हत्यारासह ही टोळी जेरबद केली आहे. बिदर रोड परिसरातील माऊली हॉटेलच्या बाजूस रात्री एक वाजण्याच्या सुमारास संशयास्पद रीतीने हालचाल करत असलेले हे चोरटे गस्तीवर असलेल्या डीबी पथकाच्या निदर्शनास आल्याने, त्यांनी तात्काळ वरिष्ठांना या संदर्भात माहिती दिली. त्यांच्याकडून आदेश घेऊन या टोळीतील संशयीतांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील साहित्याची तपासणी केली असता, गुन्हा करण्याच्या तयारीत असलेले आणि गरज पडल्यास गंभीर जखमा आणि मारहाण करण्याच्या तयारीनिशी हत्यार घेऊन हे संशयित चोर निघाल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. मोठ्या सीताफिने त्यांना ताब्यात घेऊन, त्यांच्या जवळून चार लाख पंधरा हजार रुपये रोख रक्कम तसेच आयटेल कंपनीचे दोन मोबाईल आणि विवो कंपनीचे तीन मोबाईल ज्याची अंदाजे किंमत 45 हजार रुपये, एक लावा कंपनीचा मोबाईल त्याची किंमत 13 हजार रुपये, एक स्कार्पिओ गाडी ज्याची किंमत 15 लाख रुपये, आय 20 कार किंमत दोन लाख रुपये आणि हत्यार जप्त केले. असा एकूण जवळपास 21 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे कर्मचारी गस्तीवर असताना ही कामगिरी त्यांनी केली आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी अजय विजयकुमार पांढरे (वय 30 वर्ष), बादल विष्णू वाघमोडे (वय 24 वर्ष), राहुल साहेबराव सावंत (वय 24 वर्ष, तिघे रा. नवरत्न नगर, रावी, साई रोड लातूर) तसेच महादेव धोंडीराम गोमारे (वय 31 वर्ष, रा. तिरुपती नगर, रावी लातूर), अक्रम खादर शेख आणि जफर शेख अशा सहा जणांना दिनांक 9 फेब्रुवारी रोजी एक वाजण्याच्या सुमारास बिदर रोडवरील माऊली हॉटेलच्या समोर दक्षिणेस ताब्यात घेतले. याप्रकरणी संतोष उर्फ नाना माधवराव शिंदे (वय 36 वर्ष) पो.ना. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 70/ 25 कलम 310 (4) (5) भारतीय न्यास संहिता सहकलम 4/ 25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी ही घटना स्थळास भेट दिली. ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण शाखेला आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. हा गुन्हा पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकते यांनी दाखल केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे हे अधिक तपास करत आहेत. संशयित आरोपींना अटक करण्यामध्ये ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवकते पोलीस निरीक्षक भिसे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील राम बनसोडे, राहुल नागरगोजे, नाना उर्फ संतोष शिंदे, नामदेव चेवले, राजकुमार डेबिटवार, पोहेका नकुलवाड, सचिन नाडागुडे, राजकुमार देवडे यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. या गुन्हेगाराकडून इतर अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता उदगीर ग्रामीण पोलिसांच्या तपास पथकाला आहे. मोठ्या चोरीच्या तयारीत असलेल्या या गुन्हेगाराकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे समजते.
Discussion about this post