सोनगीर प्रतिनिधी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन द्वारे प्रायोजीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे/ नंदुरबार द्वारे आयोजित अभ्यास दौरासाठी गुजरात राज्यातील अहमदाबाद,गांधीनगर व मेहसाणा या जिल्ह्यातील विविध संस्था व शाळांचा अभ्यास दौरा नुकताच संपन्न झाला. एससीइआरटी, पुणे संचालक मा. राहुल रेखावार सो. यांची प्रेरणा आणि धुळे डायट प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर व नंदुरबार डायट प्राचार्य डॉ.बेलन यांच्या मार्गदर्शनात अभ्यासदौरा समन्वयक अधिकारी धुळे डायट डॉ.रमेश चौधरी आणि समन्वयक अधिकारी नंदुरबार डायट डॉ. राजेंद्र महाजन यांनी या अभ्यास दौऱ्याचे नियोजन व आयोजन केले होते. सोबत सहाय्यक अधिकारी चंद्रकांत पवार, सुभाष वसावे यांच्यासोबत दोन्ही जिल्ह्यातील 35 शिक्षकांचा समावेश अभ्यास दौऱ्यात होता.
सदर अभ्यास दौऱ्यासाठी गुजरात शासनाने अभ्यास दौरा संपर्कासाठी श्री पीयूष पटेल, मुख्याध्यापक यांना जबाबदारी सोपवली होती.
सदर चार दिवसीय अभ्यास दौऱ्यात आयआयटी गांधीनगर, येथील क्रिएटिव्ह लर्निंग सेंटर येथे भेट देवून शालेय शिक्षणात विविध शैक्षणिक साहित्य आणि विविध खेळांच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण कसे देता येते याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.
गुजरात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था,गांधीनगर येथील नाविन्यपूर्ण उपक्रम व विविध शैक्षणिक प्रकल्पांची अभ्यासपूर्ण माहिती घेवून गुणवत्ता विकासातचे कार्यक्रम जाणून घेतले. गुजरात राज्याच्या शैक्षणिक स्थितीबाबत कामकाजाचे वरिष्ठ प्रोग्रामिंग अधिकारी डॉ.योगिता देशमुख यांनी सादरीकरण केले. विद्या समीक्षा केंद्र, गांधीनगर येथे गुजरात राज्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांच्या सांख्यिकीय माहितीच्या विश्लेषण केंद्रास भेट देऊन तेथील राज्यस्तरीय सनियंत्रण आणि शाळा विकासातील भूमिका व जबाबदारी, सक्षमीकरणासाठीच्या सुविधा समजून घेता आल्यात.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,गांधीनगर येथे भेट देऊन तेथील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा तसेच शिक्षकांसाठी सुरु असलेल्या आणि शिक्षकांनी केलेल्या उपक्रमांचा अभ्यास करण्यात आला. यावेळी तेथील कार्यशाळेत उपस्थित शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्याविषयी शिक्षकांना जाणून घेता आले.
सदर अभ्यास दौऱ्यात गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील प्रसिद्ध असलेले सायन्स सिटी या प्रकल्पास भेट देण्यात आली. येथील भेट अभ्यास दौऱ्यातील मानबिंदू ठरली. यात IMAX थिएटरमध्ये 3D शोचा मधील अंतराळ आणि अंतराळ मोहीम याचा अभ्यासपूर्ण आनंद घेता आला. जलीय गॅलरीत समुद्री व गोड्या पाण्यातील विविध जलीय प्राणी चक्र प्रत्यक्ष पाहता आले. रोबोटिक्स गॅलरीत नाचणारा रोबोट, विविध प्रकारचे रोबोट्स, शेती ,वैद्यकीय क्षेत्र,खेळ यासह दैनंदिन जीवनात रोबोटच्या उपयोगाबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहता आले.
अहमदाबाद येथील इसरो या संस्थेतील विक्रम साराभाई स्पेस एक्झिबीशन सेंटर येथे भेट देऊन तेथील पीएसएलव्ही, जीएसएलव्ही रॉकेट लॉन्चर सह इस्रोच्या कामकाजाबाबत संपूर्ण वैज्ञानिक, अंतराळ मोहीम यांचे अभ्यासपूर्ण निरीक्षणाची संधी प्राप्त झाली.
अभ्यास दौऱ्यात सहभागी शिक्षक व अधिकारी यांनी साबरमती आश्रम येथे भेट देऊन महात्मा गांधींच्या जीवन चरित्राचा, बुनियादी शिक्षण, क्षमता व कौशल्य आधारित शिक्षणाची जोड यांचा अभ्यास अनुभव घेतला.
तसेच सदर अभ्यास दौऱ्यात अहमदाबाद महानगरपालिकेतील पीएम श्री पब्लिक स्कूल,ईसाईनगर या शाळेत भेट देऊन तेथील विद्यार्थी,शिक्षक, अधिकारी यांच्याशी संवाद साधून शैक्षणिक प्रक्रिया आणि प्रगती बाबत चर्चा केली. तसेच तेथील विविध नाविन्यपूर्ण शाळेतील कृती उपक्रम, प्रयोग, प्रात्यक्षिक यासह भौतिक सुविधांबाबत जाणून घेतले.
गुजरात राज्यातील सांस्कृतिक जीवन समजून घेतले. शालेय अभ्यासक्रम, शैक्षणिक अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्य, नाविन्यपूर्ण कृती, आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर यासह भौतिक सुविधांचा शैक्षणिक प्रयोजनासाठी उपयोग तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत प्रत्यक्ष सहभाग समजून घेतला. त्यानंतर गुजरात राज्यातील उत्तर गुजरात मधील मेहसाणा या जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे भेट देऊन तेथील शैक्षणिक कामकाज समजून घेतले तसेच मेहसाणा जिल्ह्यातील शिक्षकांनी इनोव्हेटिव्ह पॅडऑगॉजिकल प्रोजेक्टचे सादरीकरण उपक्रमात सहभाग घेतला.
या ठिकाणी मेहसाणा जिल्ह्यातील 38 शिक्षकांनी नाविन्यपूर्ण साहित्य प्रदर्शनीत मांडले होते. याबाबत जाणून घेता आले. तसेच मेहसाणा जिल्ह्यातील जिल्हा पंचायत शाळा, विठोडा येथे भेट देऊन तेथील शैक्षणिक कृती उपक्रम यांचा अभ्यास केला. सदर शाळेने समाजसभागातून एक कोटी पंचवीस लाखपेक्षा जास्त रक्कम जमा करून भौतिक सुविधांसह शैक्षणिक सुविधा उपलब्धतेबाबत केलेले कामकाज तसेच तेथील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा भाषिक कौशल्य यासह आयसीटी लॅब यांच्या वापराबाबत जाणून घेतले.
शाळेच्या शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने केलेले कामकाजाबाबत तेथील मुख्याध्यापकांनी मागील 27 वर्षाच्या अनुभवातून शैक्षणिक प्रगतीचा आलेख शिक्षकांसमोर मांडला. सदर अभ्यास दौऱ्यात सहभागी शिक्षकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे विविध शाळा व संस्थांना भेटी देऊन शैक्षणिक प्रक्रिया समजून घेतली. सदर अभ्यास दौऱ्यासाठी गुजरात राज्यातील विविध संस्था यांनी सहकार्य केले.
या अभ्यास दौऱ्यातील अनुभवाच्या आधारे सहभागी शिक्षकांनी आपल्या शाळेतील शिक्षकांची सहविचार सभा घेवून अनुभव कथन करून शाळेचा भौतिक व शैक्षणिक विकास साधण्यासाठी भविष्यगामी नियोजन आणि कृतीपूर्ण वाटचाल करून खऱ्या अर्थाने पीएम श्री शाळांची निर्मिती करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा अशी अपेक्षा अभ्यास दौरा समन्वयक अधिकारी डॉ. राजेंद्र महाजन आणि डॉ रमेश चौधरी यांनी व्यक्त केली आहेत.त्यासाठी शाळांना नियमितपणे भेटी दिल्या जाणार आहेत.
Discussion about this post