
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा : जीवन व्यतीत करत असताना आपल्याला अनेक नाते हे मिळत असतात,काही जन्मजात सोबत येतात तर काही आपण जसजसे मोठं व्हायला लागतो व समाजात वावरायला लागतो तेव्हा मिळतात. अशाच आपण आज दोन प्रेमळ नात्यांबद्दल येथे विचार करूयात पहिलं म्हणजे मुलं आणि दुसरं म्हणजे पालक. आज आपण बघत आहे प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या आयुष्यात फार व्यस्त होत चाललेला आहे. मुलं मुलांच्या आयुष्यात व्यस्त होत जात आहेत तर पालक पालकांच्या त्यामुळे कुठेतरी मुलं आणि पालकांमधील नात्यात दुरावा वाढत आहे. आता हा दुरावा का येत आहे याबद्दल सुद्धा आपण विचार करूयात आणि हा विचार करताना काही बाबी आपल्याला सुद्धा लागू होतात का हे स्वतः तपासून पहावे,मग तुम्ही पालक असा किंवा मुलं हा भाग दोघांसाठीही अत्याधिक महत्त्वाचा आहे. आज आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत फिरतो माणसाने फारच प्रगती केली मग तो चंद्रावर जाऊन आला किंवा इतर कुठल्या ग्रहावर परंतु तंत्रज्ञानाचा जरी विकास झाला असेल पण हेच तंत्रज्ञान कुठेतरी मानवी नात्यांमध्ये दुरावा सुद्धा करण्याचं काम करत आहे हे प्रत्येकाला मान्यच करावे लागेल. आज आपण बघतो की तंत्रज्ञानाचा वापर करताना फार अतिरेक आपण करत आहोत मग यामध्ये आपण मोबाईल,इंटरनेट आणि सोशल मीडिया सध्या याचाच विचार करूयात आणि सध्या तरी पालक आणि मुलांमध्ये जर सगळ्यात जास्त दुरावा येत असेल तरी या फक्त तीन गोष्टींमुळे होत आहे. पालकही एवढे मोबाईल मध्ये व्यस्त होतात की त्यांना घरात मुलं आहेत याचं सुद्धा भान राहत नाही. नोकरीच्या ठिकाणावरून किंवा कामावरून घरी परतल्यानंतर घरी सुद्धा त्यांना मोबाईल मध्येच वेळ देण्यात आनंद वाटतो त्यामुळे दोघांमध्ये संवाद कमी होतो आणि यातून मग प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा,भेटण्यापेक्षा त्यांना ऑनलाईन संवाद व्यवस्थित वाटतो त्यामुळे मुलांना सुद्धा हीच सवय लागते, एक सुंदर मराठी चित्रपट आहे यावरच आधारित “ऑनलाईन बिनलाईन” अवश्य बघा. अशामुळे मुलांना येणाऱ्या अडचणी,त्यांना वेगवेगळ्या वयात पडणारे प्रश्न त्यांच्या मनात येणाऱ्या भावना हे पालकांशी मुक्तपणे सांगू शकत नाहीत त्यामुळे मुलांना असं वाटते की त्यांचे पालात फक्त त्यांना शिकवतात पण मुलांचं मात्र ऐकत नाहीत. सध्या आपण बघतो आहे की स्पर्धा परीक्षेचा जग आहे यामध्ये पालकांना त्यांच्या मुलांकडून खूप जास्त अपेक्षा असतात मग अपेक्षेच्या भावनेने मुलांवर जबरदस्तीने पालकांना आवडणारे ठराविक क्षेत्रच निवडण्याचा दबाव येतो आणि कुठेतरी याच मुलांवर जबरदस्तीने अभ्यास करायला भाग पाडतात यामुळे बऱ्याचदा पालकांपासून मुलं ही लपून निर्णय घेतात व यामुळे सुद्धा त्यांच्या दुरावून निर्माण होतो. त्याचबरोबर दोन पिढ्यांमधील अंतर ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो तरीसुद्धा फार महत्त्वाचे कारण आहे यामध्ये मुलं हे नवीन विचारसरणीचे असतात तर पालक जुन्या पद्धतीने धरून राहतात मग यामध्ये मतभेद होतात. पालक नेहमीच त्यांना त्यांच्या काळाबद्दल सांगत राहतात ‘आमच्या काळात असं होतं’ ‘आमच्या काळात असं नव्हतं’ पण एकीकडे मात्र पालक कुठेतरी बदल स्वीकारताना दिसत नाहीत. आज परिस्थिती अशी आहे कुठेतरी जे दोघांमधील नातं होतं त्याच्यात जी भावनिक जोड होती ते कमी होत आहे. त्यामुळे प्रत्येकच वेळेस मुलांना हव्या असलेल्या सहवासाची प्रेमाची त्यांना कुठेतरी कमी जाणवते, पालक त्यांच्यासोबत वेळ घालवत नाहीत. त्याचबरोबर बऱ्याचदा हे सुद्धा आपल्या लक्षात येते की मुलांना त्यांचे स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सुद्धा दिले जात नाही. मुलांनी कोणता करिअर निवडावं किंवा कोणत्या मित्र-मैत्रिणी सोबत राहावं अशा बंधनात त्यांना पालक अडकवतात. त्यामुळे बऱ्याचदा पालकांपासून अनेक गोष्टी लपवल्या जातात आणि मूलही मग बंडखोरी करायला लागतात. बऱ्याचदा आपण आपल्या घरात बघतो किंवा शेजारी बघतो किंवा समाजात बघतो अनेक वेळेस शेजाऱ्या मुलांशी किंवा शाळेतील मुलाशी त्यांच्या तुलना पालक करायला लागतात अनेकदा त्यांना नियमित एक वाक्य म्हणताना आपण बघतो ‘याच्यासारखा अभ्यास कर’ ‘तो बघ किती हुशार आहे’ आणि अशाच बोलण्यामुळे सततच्या तुलनेमुळे मुलांना कमीपणाची भावना निर्माण होऊन ते स्वतःला कुठेतरी कमी समजतात.आपण बघतो कि मुल त्याचं शिक्षण संपल्यानंतर विदेशात जातात आणि नंतर घरी लक्ष सुद्धा देत नाहीत मग आपणच एकतर्फी बोलायला सुरुवात करतो कि लेकराला लहानच मोठ केल चांगल शिकवलं आणि आज तेच लेकरू आई वडिलांना विसरलं,बोलायला चांगल वाटत हे पण याचा खोलवर विचार केला तर एक लक्षात येईल कि अश्या लेकरांना पाहिजे ते भेटलं मात्र प्रेमाला ते मुकलेत ,सध्या एक IIT बाबा म्हणून प्रसिद्ध झालेला एक साधू आहे,त्याला जेव्हा पत्रकार विचारतात कि एवढी चांगली नौकरी ,संपत्ती सोडून सन्यास का घेतला आणि आई वडिलांचा एवढा दोष का तर तो एका शब्दात त्याच उत्तर देतो कि मला प्रेम मिळालं नाही,वेळ मिळाला नाही त्यांच्याकडून त्यामुळे मुलांना वेळ देणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल.
वरील सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला नात्यातील दुरावा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघितलं पाहिजे. सर्वप्रथम आठवड्यातून असा एक दिवस कुटुंबासाठी ठरवा ज्यामध्ये तुम्हाला मुलांसोबत एकत्र वेळ घालवता येईल त्यांच्यासोबत खेळता येईल कारण जबाबदारी आणि फक्त अभ्यासच महत्त्वाचा नाही तर आयुष्यात मजाही फार महत्त्वाची आहे हे यातून सिद्ध होईल, आपल्यालाही कळतं की प्रत्येक मुलगा हा वेगवेगळा असतो त्यामुळे त्याच्यावर बंधन लादता किंवा तुला हेच करायचं आहे असा हुकूम न देता बेटा तुला काय वाटतं असं त्यांना प्रश्न विचारा व त्यांच्या मनात काय काय संकल्पना आहेत ह्या जाणून घ्या. यामुळे काय होईल मुलांची मतं आपल्याला माहित पडेल त्यामुळे त्यांना जबाबदाऱ्यांची जाणीव होईल. मुलांना सध्याच्या युगात आधाराची आणि प्रेमाची फार आवश्यकता आहे त्यामुळे प्रत्येकच वेळेस त्यांच्यावर न रागावता त्यांना समजून घ्या. तंत्रज्ञानाचा स्वतःही आणि मुलांकडून सुद्धा योग्य वापर करून घ्या, मुलांवर तंत्रज्ञानाच्या बाबतीत सक्ती करू नका मात्र त्यांच्यावर मर्यादा ठेवा. घरात असताना मोबाईल साठी किती वेळ द्यायचा किंवा नो मोबाईल टाईम ठरवा. मुल आणि पालकांमधील संवाद जेवढा वाढेल तेवढे फायद्याचं, यामुळे मुलं हे त्यांच्या मनातील विचार सांगतील गरज पडेल तेव्हा मात्र सल्ला द्या पण जबरदस्ती करू नका.
रंजित उंदरे (समुपदेशक)
९०९६३३३७४०..
Discussion about this post