
सूरज आनकाडे, कंधार प्रतिनिधी..
कंधार :
तालुक्यातील श्रीक्षेत्र उमरज (प्रति पंढरपूर) येथे श्री संत सदगुरू नामदेव महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त गुरुवार, २७ फेब्रुवारी ते गुरुवार ६ मार्च दरम्यान, १०८ कुंडी विष्णूयाग यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती एकनाथ महाराज यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यामधील कंधार
तालुक्यातील श्रीक्षेत्र उमरज (प्रति पंढरपूर) येथे येत्या गुरुवारी, २७ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरु होत आहे. या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते ‘देवकीनंदनजी ठाकूर महाराज’ यांच्या वाणीतून सात दिवस कथा सांगितली जाणार आहे. तसेच विविध कीर्तनकार समाजप्रबोधन करणार आहेत. यासाठी एक एकरवर तज्ञ मंडप तर पंधरा एकरवर कथा मंडप उभारण्यात आला आहे. या सप्ताहामध्ये रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी, २८ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आदींसह नांदेड, लातूर जिल्ह्याचे आजी-माजी खासदार, आमदार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
यावेळी मंगळवार, ४ मार्च रोजी दुपारी १२.३५ वाजता श्री शारदापीठ, व्दारकाधाम, गुजरातचे जगतगुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वतीजी महाराज व शांतीब्रम्ह मारोती बाबा कुहेकर यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक साधु, संत, महंत यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून श्री संत सदगुरू नामदेव महाराज मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व कथा मंडपावर पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे.
दर्शनासाठी प्रत्येक दिवशी एक लाख, तर शेवटच्या दिवशी दोन लाख भाविक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येणाऱ्या भाविकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. भाविकांच्या मदतीसाठी एक हजार स्वयंसेवक राहणार आहेत. तसेच कार्यक्रमासाठी एकूण ३१ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीकडे वेगवेगळी कामे देण्यात आली आहेत. याप्रसंगी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी श्री संत नामदेव महाराज संस्थान व तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. या विविध धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती एकनाथ महाराज यांनी केले आहे.
यावेळी शंकर महाराज लोंढे, माऊली महाराज तिडके, विशाल महाराज, निळकंठ महाराज, गजानन घोरबांड, नवनाथ तोरणे, जगदीश धोंड, निलेश गौर, श्यामसुंदर मुंडे आदी उपस्थित होते.
Discussion about this post