मिरज तालुक्यातील तानंग ग्रामपंचायत हद्दी मधील खुल्या भूखंडामध्ये बेकायदा वराह अर्थात डुक्कर पैदास होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे या भागात भयंकर दुर्गंधी पसरली असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि डुक्करे तात्काळ जिल्हा प्रशासनाने हलवावीत अशी मागणी सरपंच यांच्यासह सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी मागणीद्वारे केली आहे. ग्रामपंचायत हद्दी मधील बिगर शेत जमीन गट क्रमांक २८४ आणि २८५ हे खुले भूखंड आहेत या गटामध्ये अनेकांच्या मालकीचे भूखंड आहेत. काही नागरिकांनी आपली बांधकामेही केली आहेत. तरीही एका व्यक्तीने या खुल्या भूखंडावर बेकायदा डुक्करांची पैदास आणि पालन केले आहे अशा तक्रारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावरून ग्रामपंचायतने या संबंधित व्यक्तीस हा प्रकार बंद करण्याच्या वारंवार सूचनाही देऊ केल्या आहेत मात्र या व्यक्तीने आपली मनमानी सुरूच ठेवल्याचे निवेदनात म्हणले आहे. तसेच निवेदनात म्हणले आहे कि हे दोन्ही भूखंड खुले करून ग्रामपंचायतीस मिळावेत हे निवेदन तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनाही दिले आहे. आता प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Discussion about this post