दिल्लीत आज मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.
संमेलनात पंतप्रधान मोदीजी उपस्थित होते. शरद पवार ह्यांनी हे भाग्य माझ्या वाटेला दिले हे सांगताना आणि त्याच्या बरोबर वावरताना जी देहबोली मोदीजी ह्यांची होती ती एका संस्कारीत राजकारण्याची होती. दीप प्रज्वलन करताना पवारांना बोलावून घेणे , खुर्ची सरकवून त्यांना बसण्यास मदत करणे , स्वतः पाणी ओतून पवार ह्यांना देणे हे सगळे पवार ह्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान होता. राजकीय मतभेदाचा पलीकडे मानवी सबंध असले पाहिजे हा घरंदाज संस्कार त्यांनी महाराष्ट्रातील एकेरीवर येणाऱ्या टुकार राजकारण्यांना दाखवून दिला !
पण …जेव्हा मोदीजी भाषण करण्यास उभे राहिले तेव्हा महाराष्ट्रातील साहित्य महामंडळ स्थित सगळ्या पुरोगामी , लिब्रांडू मंडळींना त्यांनी मराठी आणि महाराष्ट्राची जी परंपरा आठवण करून दिली, त्यातून तात्विक आणि वैचारिक दृष्ट्या आपण किती पक्के आहोत हेही त्यांनी दाखवून दिले.
ह्या सगळ्या मंडळीनी पुरोगामित्वाचा नावाखाली साहित्य , संस्कृती आणि कला क्षेत्रात जो धुमाकूळ घातला आहे त्या सर्वांना महाराष्ट्र नेमका कुणामुळे ओळखला जातो ? मराठी भाषेचे वैभव कसे आहे? हे सांगताना ज्या महापुरुषांची नावे मोदीजी ह्यांनी घेतली त्याच महापुरुषांना ह्या विशिष्ट प्रकारच्या ecosystem ने हद्दपार करण्याचा गेली ४० वर्षे जणू चंगच बांधला होता. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी म्हणवणारे राजकारणी पण लाजे काजेस्तव ह्या महापुरुषांची आडून पाडून नावे घेत होती. पण मोदींनी एकाचवेळी पुरोगामी आणि हिंदुत्ववादी ह्यांना तत्वाचा , विचाराचा निग्रह काय असतो आणि तो कसा मांडता येतो हेच कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता सहजपणे दाखवून दिले.
त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे , तुकारामांच्या.गाथेत आहे हे सांगताना आपली उज्वल संत परंपरेची आठवण करून दिली. त्याच बरोबरं समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या मराठा तितुका मेळावा ! हा उल्लेख करताना त्यांनी कुठलाही न्यूनभाव मनात ठेवला नाही.
संपूर्ण देशाला स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारे टिळक , सावरकर , वासुदेव बळवंत फडके , चाफेकर हे सगळे मराठी भाषिक होते हे सांगताना रणावीण स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले हेच अप्रत्यक्ष पणे अधोरेखित केले .
लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथाचा जाणीवपूर्वक दोनदा वेगवेगळ्या संदर्भात केलेला उल्लेख विशेष म्हणावा लागेल. मराठी मध्ये गीतेवर टीकात्मक ग्रंथ ज्ञानेश्वरी हा आजही सगळ्यांचा संदर्भ ग्रंथ आहे हे सांगीतले.
छत्रपति शिवाजी महाराज ह्यांच्या पराक्रमाला साजेशी मराठी भाषा आहे आणि मग छावा ह्या सध्या सर्वात चर्चेत असणाऱ्या संभाजी राजांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाचा उल्लेख करताना मोदीजी ह्यांनी शिवाजी सावंत ह्यांच्या मूळ छावा ह्या मराठी कादंबरी वरून हा चित्रपट निर्माण केला गेला आहे हे आवर्जून सांगीतले. त्यांनीं पेशव्यांच्या पराक्रमाचा गौरव करताना कुठले ही आढेवेढे घेतले नाहीत.
शिवाजी महाराज ह्यांच्या राज्याभिषेक वर्षाला ३५० वर्षे , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्यांच्या जन्म वर्षाला ३०० वर्षे हा उल्लेख तर त्यांनीं केलाच पण त्यानंतर संघाबद्दल त्यांनी काढलेले उदगार सर्व स्वयंसेवक , कार्यकर्ते ह्यांना सुखावणारे आणि अभिमान बाळगावा असे ठरले.
१०० वर्षापूर्वी महाराष्ट्रात एका डॉ .केशव बळीराम हेडगेवार ह्या महापुरुषाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या संघटनेचे बीज.रोवले आणि आता तो एक वटवृक्ष बनला आहे हे सांगीतले. वेदांच्या पासून ते विवेकानंद ह्यांच्या विचारधारेला स्थापित करण्यासाठी निर्माण झालेले कार्य असा संघकार्याचे वर्णन करताना त्याचा उल्लेख संस्कार यज्ञ ह्या शब्दात त्यांनी केलाच आणि माझ्यासारख्या लाखो लोकांना देशासाठी समर्पित होण्याची प्रेरणा संघाने निर्माण केली आहे हे पण विशेष करून सांगीतले.. माझी मराठीची ओळख दृढ होण्यास संघ कारणीभूत आहे हे ही त्यानी सांगीतले.
येथे आपण हे लक्षात घेऊ या की मोदीजी ह्यांच्या एक बाल स्वयंसेवक ते प्रचारक , कार्यकर्ता ह्या संपूर्ण प्रवासात त्यांच्या जीवनाला आकार देणारे योगायोगाने बरेच मराठी भाषिक प्रचारक होते. मधुकरराव भागवत (पूजनीय मोहनजी ह्यांचे पिताश्री ), लक्ष्मणराव इनामदार तथा वकील साहेब , मधुभाई कुलकर्णी असे किती तरी नावे सांगता येतील. त्यांच्या ह्या एका वाक्यात अशा अनेक अनामिक कार्यकर्त्यांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव होता.
त्यांनी शि . म. परांजपे ,रानडे, गोखले , आचार्य अत्रे , वीर सावरकर ह्या सगळ्या जुन्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा उल्लेख करताना आजच्या उथळ , अर्ध्या हळकुंडानी पिवळ्या झालेल्या साहित्यिक महामंडळातील पोटभरू मंडळींना एक प्रकारे विसरलेल्या उज्वल परंपरेची आठवण करून दिली. त्यांनी ज्योतिबा , सावित्रीबाई , महर्षी कर्वे आणि पुज्य बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या माध्यमातून मराठी भाषेने समाज सुधारणेचा कसा मार्ग अवलंबला हे सांगितलेच पण मराठीने दलित वेदनेतून निर्माण झालेल्या दलित साहित्याचा पण गौरवपूर्ण उल्लेख केला.
,संपूर्ण महाराष्ट्राला गीत रामायण रचून मोहित करणारे आधुनिक वाल्मिकी गदिमा ह्यांच्या पूर्ण नावाचा त्यांनी केलेला उल्लेख अनेकाना अचंबित करून गेला तर सुधीर फडके ह्यांच्या बरोबर ह्या गीत रामायणाने अद्भुत परिणाम समाज जीवनावर केल्याचे त्यांनी सांगीतले.
मोदीजी ह्यांच आजचे भाषण खऱ्या अर्थाने संपूर्ण मराठी साहित्याचा आढावा घेणारे ठरलेच पण त्याच बरोबर मराठी माणसाच्या पराक्रमाचे , त्याच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारे असे होते. ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांच्या पुढे देशाची राजधानी नतमस्तक होत आहे हा उल्लेख आमच्या संत परंपरेने आखिल भारतात
पोहचवलेल्या भक्तिमार्गाची जणू पोहोच पावतीच होती.
मराठी सारस्वतात गेल्या ३०/४० वर्षात घुसलेल्या बांडगुळाना त्यांच्या राजकीय आश्रय दात्यासमोर मोदीजी जेंव्हा हा चिंतनशील आरसा समोर ठेवत होते तेंव्हा त्या सर्वांचे चेहरे हे बघण्यासारखे झाले होते. सत्य तर स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता पण टाळ्या वाजवण्याचे साहस पण नव्हते. अधून मधून काही टाळ्यांच्या आवाजाने ह्या संमेलनात काही राष्ट्रीय विचाराचे प्रतिनिधी उपस्थित आहेत हे कळत होते आणि महाराष्ट्रात साहित्याच्या क्षेत्रात अजूनही राष्ट्रीय विचाराच्या मंडळींना खूप पल्ला गाठायचा आहे हे लक्षात येत होते.
मोदीजी ह्यांनी आज एकीकडे मराठी भाषिक पुरोगाम्यांना त्यांच्या ढोंगी निवडक वृत्तीचा आरसा दाखवलाच पण दुसरीकडे आपल्या बाजूने सत्य असेल आणि तेच आपले तत्व असेल तर कसे निर्भय पणे मांडले पाहिजे ह्याचा जणू धडाच साहित्य , सामाजिक , राजकीय क्षेत्रातील स्वतःला राष्ट्रीय विचाराचे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना घालून दिला!
ह्या बद्दल मोदीजी ह्यांना धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत
अ.वि.पवार....
Discussion about this post