मिझोराम राज्यातून बहेलिया टोळीतील पुन्हा एकाला अटक
पाच दिवसांची वनकोठडी
गोंडपिपरी : मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा क्षेत्रातील चुनाळा येथून बहेलिया टोळीला जेरबंद केल्यानंतर मेघालय, हरियाणा, पंजाब येथून तिघांना अटक करण्यात आली. यानंतर मिझोराम राज्यातील आयजोल येथून बहेलिया टोळीतील पुन्हा एकाला अटक केली. जनखानकाप पुत्र धंगजाचीन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर भारत ते म्यानमार वाघांचा अवैध व्यापार व आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.
आरोपीला राजुरा न्यायालयात हजर केले असता त्याला २५ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेले दहा आरोपी ५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणातील आरोपीची संख्या ११ वर पोहोचली आहे.
कुख्यात बहेलिया टोळीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास एसआयटी पथकाकडून सुरू आहे. या तपासात वाघाची शिकार करून त्याचे अवयवाची तस्करीसाठी तस्कर म्यानमार मधून भारतात प्रवेश करून अन्य राज्यातील तस्करपर्यंत पोहोचत होते. या तस्करीचे नेटवर्क भारतभर पसरले असून त्याची कसून चौकशी एसआयटी पथकाकडून सुरू शिकारीचे पाळेमुळे शोधून तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Discussion about this post