
सावनेर : खापा वनपरिक्षेत्रातील सोनपूर गावाजवळ वाघाने गाईची शिकार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या अगोदर सुद्धा या परिसरात अश्या घटना घडलेल्या आहे. परंतु वारंवार होत असल्यामुळे या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण दहशत पसरली असून, शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह स्वतःच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे.
शनिवारी (दि.22) सकाळच्या सुमारास शेतकरी डिगांबर नागोजी भलावी यांनी आपली गाय चरण्यासाठी शिवारात सोडली. मात्र, ती सायंकाळी घरी परतली नाही. शोध घेत असताना मध्यरात्री शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत गायीचा मृतदेह आढळला. वाघाच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
वनपरिक्षेत्रअधिकारी सचिन आठवले यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक सतीश गडलिंगे आणि वनरक्षक प्रिया भंडारे यांनी पंचनामा केला. मृत गायीचा शवविच्छेदन अहवाल लवकरच येणार आहे.या घटनेनंतर परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, वाघाचे हल्ले वांंरवर वाढल्याने सुरक्षेची मागणी केली जात आहे. वनविभागाने नुकसानभरपाईचे आश्वासन दिले असले तरी, गावकऱ्यांनी तातडीने संरक्षण उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
वनविभागाने यावर तातडीने कारवाही करण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे खूप जास्त प्रमाणत नुकसान होऊ शकते.

Discussion about this post