शहरात भाजी विक्री करणाऱ्या महिलांना शुल्क माफीची मागणी.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर देखील रत्नागिरी मधील महिलांना बाथरूम साठी आडोसा शोधावा लागतोय हे रत्नागिरी न.प.प्रशासनास नक्कीच भूषणावाह नाही.असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर व उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर,माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, शहर अध्यक्ष बाबय भाटकर यांच्या मार्गदर्शनखाली शहर महिला आघाडी मार्फत न.प. प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेऊन शहरात महिलांना होणाऱ्या गैरसोईचा पाढाच वाचला. रत्नागिरी शहरांत महिलांकरिता एकही स्वच्छतागृह मोफत नाही आहे. मुळात स्वच्छताग्रहच अत्यल्प आहेत व जी काही मोजकी आहेत त्यामध्ये शुल्क आकारले जाते. पुरुषांना मोफत आणी महिलांना सशुल्क असा भेदभाव का? असा सवाल देखील मनसे महिलांनी विचारला. राम आळी मधील स्वच्छतागृहात शुल्क घेऊन देखील भाजी विक्रेत्या महिलांवर तेथील कर्मचारी अरेरावी करतो अशी तक्रार असल्याचे देखील निदर्शनास आणून देण्यात आले.
या सोबतच रत्नागिरी शहरात ग्रामीण भागातून अनेक महिलांना रोजगार नाही म्हणून रस्त्यावर बसून भाजी किंवा आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. या महिलांना न.प. कडून 20 ते 60 रुपये शुल्क आकारले जाते. सकाळ पासून दुपार पर्यंत उन्हात बसून विक्री करून दोन चारशे रुपये कमवून घर चालवणाऱ्या महिलांकडून 40 ते 60 रुपये रोजचे घेणे हे चुकीचे आहे. हे शुल्क माफ करावे व या महिलांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य झाली तर शेकडो महिलांना दिलासा मिळणार आहे.
थिबा पॅलेस परिसरातील सुर्वे घाटी मध्ये गटाराचे पाणी येऊन दुर्गंधी पसरली आहे. त्याबद्दल योग्य कारवाई करून तो परिसर दुर्घन्धी मुक्त करावा व जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महिला शहर अध्यक्ष सुश्मिता सुर्वे,शहर संघटक बिस्मिल्लाह नदाफ, शहर सचिव संपदा राणा व इतर महिला महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Discussion about this post