
ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोज मंगळवार ला ‘रक्तदान व मरणोत्तर अवयव दान’ या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निलेश ठवकर, प्रा. रोहित चांदेकर आणि रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. बिजनकुमार शील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर सुनंदा अस्वले यांनी रक्तदान व अवयव दान यांचे महत्व पटवून सांगितले.
तसेच रक्तदान केल्याने अनेकांना जीवनदान मिळते, मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होते, गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे असते आणि बहुतेक लोक जोपर्यंत त्यांची तब्येत चांगली आहे तोपर्यंत रक्तदान करू शकतात असे मत व्यक्त केले. नेत्रदानाविषयी माहिती देत असताना प्रा. रोहित चांदेकर यांनी सांगितले की आपल्या भारतात दहा दशलक्ष पेक्षा जास्त दृष्टिहीन आहेत त्यापैकी 1/5 दृष्टिहीन कॉर्निया अपारदर्शक झाल्याने अंध आहेत आणि या 1/5 पैकी 60% हे बारा वर्षाखालील मुले आहेत यांना दृष्टी मिळू शकते.
अवयव दानासाठी प्रेरित करताना डॉक्टर निलेश ठवकर यांनी सांगितले की नैसर्गिकपणे मृत्यू झाल्यानंतर व्यक्ती डोळे, त्वचा, त्वचेखालील आवरण, हाडे, स्नायू बंध, कार्टीलेज, रक्तवाहिन्या (नीला, रोहिणी) आणि मध्य कानातील हाडे इत्यादी अवयव दान करू शकतो. मेंदूस्तंभ मृत्यूनंतर सर्वात जास्त अवयव दान शक्य आहे कारण ती अशी स्थिती आहे की हृदय चालू असते पण श्वसन कायमचे बंद झालेले असते. डॉ. बिजनकुमार शिल यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की भारतात 125 कोटी लोक राहतात रोज 62,389 मृत्यू होतो यापैकी जर 100% मृत व्यक्तींनी नेत्रदान केले तर केवळ 11 दिवसात देशातील सर्वच कॉर्निया अपारदर्शक अंधांना दृष्टी मिळू शकते. तसेच केवळ पाच टक्के मृतांच्या डोळ्यांचे दान झाले तर 220 दिवसात सर्वच कॉर्नियल अंधांना दृष्टी मिळेल. कोणत्याही वयात चष्मा असेल मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले असेल तरीही मृत्यूनंतर नेत्रदान करता येते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post