आज-यातील सिद्धी शेळकेचा ‘एनआयएस’ फुटबॉल प्रशिक्षक परीक्षेत डंका
फुटबॉल खेळात कामगिरी करणारी जिल्ह्यातील पहिली महिला सिद्धी शेळके..
आजरा: प्रतिनिधी
आजरा : माद्याळ ता. आजरा हे मूळ गाव असलेल्या सिद्धी रवि शेळके हिने भारतीय खेल प्राधिकरणच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘एनआयएस’ फुटबॉल प्रशिक्षक परीक्षेत यशस्वी घोडदौड करत झंडा फडकवला आहे.अशी कामगिरी करणारी कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धी ही पहिली महिला प्रशिक्षक ठरली आहे.
सिद्धी हिचे आजोबा महादेव शेळके व आजी हेमलता शेळके माद्याळ येथे राहतात. सिद्धी आई-वडीला सोबत कोल्हापूर येथे राहते. कोल्हापूर येथील प्रसिद्ध फुटबॉल पंच व प्रशिक्षक राजू दळवी यांचे तिला मार्गदर्शन लाभले.सिद्धीला फुटबॉल खेळाची पार्श्वभूमी नसताना तिने किमया करून दाखवली आहे.
कोलकाता येथे साई एनएस इस्टर्न सेटर येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् फुटबॉल प्रशिक्षक (पतियाळा) हा सहा आठवड्यांचा अभ्यासक्रम घेण्यात आला. या परीक्षेसाठी महाराष्ट्र, राजस्थान, लक्षद्वीप, मणिपूर, पंजाब, सिक्कीम, नागालँड, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तमिळनाडू राज्यांतील परीक्षार्थी होते. त्यात सिद्धी एकमेव महाराष्ट्रीयन होती. खडतर शारीरिक क्षमता चाचणी,लेखी परीक्षेत तिने यश मिळवले.
ती कोल्हापूरातील छत्रपती शाहू विद्यालय व डीआरके कॉलेजची विद्यार्थीनी आहे. तिने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय फुटबॉल, सुब्रतो चषक आदी स्पर्धांमध्ये यश मिळवले. तिला केएसएचे पेट्रन चीफ श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, अध्यक्ष मालोजीराजे, एआयएफएफ महिला समिती सदस्या मधुरिमाराजे छत्रपती, सॉकर रेफ्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव, सचिव प्रदीप साळोखे आदींचे सहकार्य लाभले.
*रोजचा सराव, मेहनत, जिद्द, चिकाटी, आई-वडीलांचे प्रोत्साहन, वेळोवेळी राजू दळवी यांचे मार्गदर्शन आणि मधुरिमाराजे छत्रपती,केएसएचे सहकार्य यामुळे यश संपादन करता आले*.
Discussion about this post