
ब्रेकिंग न्यूज प्रतिनिधी । दि.२५ फेब्रुवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यातील व्यावसायिक सुनील झंवर यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. आजोबांच्या अस्थी हरिद्वार येथे विसर्जित करून घरी परतत असलेल्या सूरज झंवर यांच्या वाहनाला समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात सूरज झंवर यांच्यासह तिघे जखमी झाले असून चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. इंदौरजवळील मानपूर येथे रात्री १ वाजत हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील उद्योजक सुनील झंवर यांचे वडील देवकीनंदन झंवर यांचे नुकतेच निधन झाले. आजोबांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी नातू सूरज झंवर हा मित्र पलाश तोतला आणि आलोक शिवानी यांच्यासह हरिद्वार येथे गेला होता. विधी आटोपून ते दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहचले असता राजधानी एक्सप्रेस निघून गेले. रेल्वे सुटल्याने तिघे मित्र विमानाने इंदोर येथे पोहचले. त्याठिकाणी त्यांनी जळगावहून चालकाला कार घेऊन बोलावले होते.
रॉंग साईडने येणाऱ्या चारचाकीची धडक
इंदोरहून रात्री १२ वाजता निघाल्यानंतर मानपूर गावच्या जवळ रात्री १ वाजेच्या सुमारास समोरून रॉंग साईड येणाऱ्या चारचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की वाहनाच्या एअर बॅग उघडल्या. अपघातात चालक मनोज सोनी याला गंभीर दुखापत झाली. तसेच सूरज झंवर, पलाश तोतला आणि आलोक शिवानी हे देखील जखमी झाले.
जळगावच्या तरुणांनी केली जखमींची मदत
अपघातानंतर सर्व जखमी रस्त्यावर उपचाराच्या प्रतिक्षेत पडलेले होते. अपघात भीषण असल्याने स्थानिक लोक देखील त्याठिकाणी जमत होते. उत्तराखंड येथून कैंची धाम दर्शन करून जळगावातील दिनेश कोळी, दत्तू कोळी यांच्यासह काही तरुण घरी परतत होते. मानपूरजवळ जळगाव पासिंग वाहन अपघातग्रस्त झाल्याचे पाहून ते थांबले. जखमींची विचारपूस करीत त्यांनी लागलीच दोघांना आपल्या वाहनात तर दोघांना रुग्णवाहिकेने मानपूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींची अवस्था लक्षात घेऊन त्यांनी लागलीच सर्वांना इंदोर येथील चैत्राम हॉस्पिटलमध्ये हलविले.
तिघे धोक्याबाहेर, चालक गंभीर
अपघातात चारचाकी चालक मनोज सोनी याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच सूरज झंवर, पलाश तोतला आणि आलोक शिवानी हे देखील जखमी झाले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच जळगावातून सर्व नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली..
Discussion about this post