
धाराशिव जिल्ह्यात गेले दोन महिने वास्तव्यास असलेल्या वाघाने आतापर्यंत 50 हून अधिक गायींचा फडशा पाडला असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने वाघ पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली असून, त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
वारंवटी व रुईभर परिसरात वाघाचा वावर :
वाघाची शेवटची हालचाल वारंवटी आणि रुईभर या गावांमध्ये आढळून आली आहे. तसेच, येडशी अभयारण्य आणि बार्शी भागातही तो वास्तव्यास असल्याचे वन विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या वाघाचे वजन अंदाजे 200 किलोपर्यंत वाढले असून, त्यामुळे त्याला पकडणे अधिक कठीण बनले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका – वन विभागाला इशारा :
रुईभर गावात रात्रीच्या वेळी बिबट्या आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीवर तत्काळ कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी विभागीय वनाधिकारी यांची भेट घेऊन वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या धोक्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोठा अनर्थ घडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
पुणे आणि चंद्रपूरच्या रेस्क्यू टीमचा समावेश :
वाघ पकडण्यासाठी पुणे आणि चंद्रपूर येथील विशेष रेस्क्यू पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकांनी ट्रॅकिंग, ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर, आणि बेशुद्ध करण्यासाठी डार्ट गनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला आहे.
वन विभागाच्या प्रयत्नांना अपयश :
वाघाला पकडण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यात आले, परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
अनेक वेळा पिंजऱ्यांची रचना करून सापळा लावण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र वाघाच्या हालचाली अनिश्चित असल्याने वन विभाग अद्याप यशस्वी ठरलेला नाही.
जिल्ह्यात बिबट्यांची संख्याही वाढती :
धाराशिव जिल्ह्यात बिबट्यांची संख्याही वाढत असल्याची माहिती जिल्हा वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. बिबट्यांचे हल्ले होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांसाठी सतर्कतेचे आवाहन :
वन विभागाने ग्रामस्थांना खबरदारीचे उपाय सांगितले आहेत –
रात्रीच्या वेळी शेतात किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळावे.
पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.
वन विभागाच्या मोहिमेचा पुढील काही दिवसांत काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..
Discussion about this post