महाराष्ट्र शासनाने युवक युवतींसाठी त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासाठी सुरु केलेली महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये रुजू असलेल्या लिपिक पदावरील युवतींची मुदत येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. मात्र अजूनही त्यांना महापालिका प्रशासनाने किंवा महाराष्ट्र शासनाने मुदतवाढीचे पत्र न दिल्याने सध्या या युवतीच्या मनात धाकधूक लागून राहिली आहे. आमच्या प्रतिनिधींनी या युवतींची भेट घेतली असता काही युवतीं अस्वस्थ असल्याचे दिसून आले. तर आता फक्त दोनच दिवस आमच्या नोकरीचे राहिले असून प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे अशी आर्त विनवणी त्यांनी बोलून दाखवली. या सहा महिन्यांच्या प्रवासामध्ये या युवतींनी सांगली मिरज आणि कुपवाड येथे अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करत असताना चांगले धडे गिरवले आहेत. या प्रशिक्षणा दरम्यान दरमहा मिळणाऱ्या मानधनामुळे आमच्या कुटुंबाला आम्ही आर्थिक हातभार लावू शकलो मात्र जर मुदत वाढ मिळालीच नाही तर तोही हातभार कमी होईल अशा प्रकारच्या भावना या युवतींनी व्यक्त केल्या आहेत. या संदर्भात सहा आयुक्त सचिन सागावकर यांनी सांगितले कि हा निर्णय शासनाचा आहे मात्र सध्या रुजू असलेल्या युवतींकडे आमच्या कार्यालयात काम करण्याची क्षमता चांगली आहे. आम्ही नक्की आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या साठी पाठपुरावा करू.
Discussion about this post