स्वारगेटचा बलात्कारी दत्तात्रय गाडेच्या मध्यरात्री आवळल्या मुसक्या; १२ मार्चपर्यंत कोठडी
पुणे : स्वारगेटमधील बसमध्ये तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या अखेर पोलिसांनी चौथ्या दिवशी आवळल्या. गुनाट (ता. शिरूर) गावाजवळील उसाच्या फडात लपलेला गाडे तहानेने व्याकूळ झाला होता. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पाणी मागण्यासाठी गावात आला असतानाच पोलिस पथकाने झडप घालून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवण्यासाठी सरकारला विनंती करणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले,
शुक्रवारी संध्याकाळी कडेकोट बंदोबस्तात गाडेला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या परिसरात जवळपास १०० पोलिसांचा बंदोबस्त होता. आरोपीला न्यायालयात आणण्यापूर्वी गेट क्र. ४ च्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि उद्धवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांना पोलिस वाहनात बसवून शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आले.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक दोन ड्रोन कॅमेरे (थर्मल इमेजिंग) तसेच श्वान पथकाची मदत घेतली होती. जवळपास ७१ सीसीटीव्ही, ५०० पोलिस अधिकारी कर्मचारी गावात तळ ठोकून होते.
ग्रामस्थांना एक लाखाचे बक्षीस गाडेला पकडण्यात गुनाट गावातील ग्रामस्थांची मोठी मदत झाली. पोलिसांना बरोबर घेऊन ग्रामस्थांनी दुचाकीद्वारे गस्त घातली. उसाच्या फडात शिरणे सोपे नसते. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस फडात शिरले. चोहोबाजूंनी वेढा घालण्यात आला. मध्यरात्री गाडे आडवाटेने बाहेर पडल्याची माहिती एका ग्रामस्थाने दिली. त्या ग्रामस्थाच्या सतर्कतेमुळे तो पकडला गेला. त्याला पोलिसांकडून एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
गुनाट (ता. शिरूर) गावाजवळील उसाच्या फडात लपला होता. त्याचा शोध घेताना पोलिस पथक.
आरोपी दत्तात्रय गाडे याला शुक्रवारी न्यायालयात नेत असताना.
आरोपीचा दोनदा आत्महत्येचा प्रयत्न?
आरोपी दत्तात्रय गाडे हा आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडे कीटकनाशकाची बाटली सापडल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर पोलिस आयुक्त म्हणाले, ‘गाडे आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता, याबाबत आता ठोस सांगणे चुकीचे आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गाडेला ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याच्या गळ्यावर खरचटण्याच्या आणि दोरीने आवळण्याच्या खुणा आढळल्या, वैद्यकीय तपासणी अहवालात याबाबतच्या गोष्टी स्पष्ट होतील.’
शक्ती कायद्याचा फेरआढावा घेणार
मुंबई: पुण्यातील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्याचा राज्य सरकार फेरआढावा घेणार असल्याचे आणि सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर असल्याचे शुक्रवारी सांगितले. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानांबाबत विचारले असता ते म्हणाले की, कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. ते नवीन आहेत. माझा त्यांना सल्ला राहील की संवेदनशीलतेने बोलले पाहिजे. मंत्र्यांनी बोलताना चूक केली तर समाजमनावर परिणाम होतो.
संमतीने संबंध : आरोपीचे वकील
गाडेच्या वकिलांनी दोघांच्या
संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा न्यायालयात केला, तर हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपी हा सराईत आहे. घटना घडल्यानंतर आरोपीला कुणी आसरा दिला? यासह आरोपीची वैद्यकीय चाचणी व मोबाइल जप्त करायचा असल्याने आरोपीला चौदा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी आरोपीला १२ मार्चपर्यंत कोठडी सुनावली.
६६
दत्तात्रय गाडे याला कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही स्ट्रॉग केस करणार आहोत. भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती, तसेच खटला फास्ट टैंक न्यायालयात चालविण्यात यावा, याबाबत शासनाकडे विनंती करण्यात येईल.
अमितेश कुमार, पो. आयुक्त
Discussion about this post