मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीप्रकरणी परिसरवासीयांचा संतप्त सूर
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर मंगळवारी रात्री महिलेवरील बलात्काराची घटना ताजी असतानाच, रविवारी मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाल्याचे प्रकरण समोर आले. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनांमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून, परिसरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही
अशा घटना आपल्या समाजातील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. जर एका मंत्र्याच्या मुलीवरच अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर सर्वसामान्य महिलांची परिस्थिती काय असेल? याचा विचार करायला हवा. सरकार आणि प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक गांभीर्यान घ्यायला हवी. कायद्याचा धाक नसल्यामुळे गुन्हेगार बिनधास्त फिरतात आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होते.

कठोर कायदे करणे गरजेचे
शिव, शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांच्या विचारसरणीतून घडलेल्या महाराष्ट्रात आज महिला भगिनींवर ज्या प्रकारे हल्ले होत आहेत, हे बघून अतिशय दुःख होत आहे. आज घरापासून, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत महिला भगिनी सुरक्षित नाहीत. शासनाने कठोर कायदे करणे गरजेचे आहे. माता भगिनींच्या रक्षणाची जबादारी प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

त्यांच्या सुरक्षेची आपलीही जबाबदारी
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी प्रदेशात महिलांबाबत घडणाऱ्या घटना ऐकून चीड निर्माण होते. महिलांची सुरक्षा एकट्या सरकारची जबाबदारी नाही तर समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. महिलांची सुरक्षा हा केवळ सामाजिक किंवा कायदेशीर मुद्दा नसून, तो एक मूलभूत मानवी हक्काचा आणि सामाजिक जबाबदारीचा विषय आहे.

Discussion about this post