मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतीने मागासवर्गीय समाजासाठी मंजूर झालेला भांडी खरेदीचा निधी हडप केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या समाजबांधवांनी ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देत तातडीने चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.
2.24 लाखांचा निधी गायब?
पंधरावा वित्त आयोग 2020-21 अंतर्गत मागासवर्गीय समाजासाठी सामूहिक स्वयंपाकासाठी लागणारी भांडी खरेदीसाठी 1,49,000 रुपये आणि 2021-22 मध्ये 75,000 रुपये असा एकूण 2,24,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात कोणतीही भांडी खरेदी केली नसून हा निधी परस्पर काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामपंचायतीला निवेदन; संतप्त समाजबांधवांचा इशारा
ग्रामपंचायतीकडून निधी हडप केल्याचे समजताच प्रमोद गायकवाड, शिवाजी वानखेडे यांच्यासह समाजबांधव ग्रामपंचायतीत धडकले. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवक गैरहजर असल्याने ग्रामपंचायत सदस्यांकडे लेखी निवेदन देण्यात आले.
“आमच्या हक्काचा निधी आम्हाला मिळालाच पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा समाजबांधवांनी दिला आहे.
सरपंच-ग्रामसेवक संपर्कबाह्य; चौकशीची मागणी
या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Discussion about this post