
चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालया मधील ग्रंथालयासाठी चिमूर व परिसरातील नागरिकांनी पुस्तके दान करावीत आणि ग्रंथालय व वाचन चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी हातभार लावावा. असे आवाहन ग्रामगीता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अमरावतीचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. सुरेंद्र माणिक यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला ग्रंथदान केले. त्याचप्रमाणे डॉ. अमीर धमानी, डॉ. मृणाल वऱ्हाडे, डॉ. निलेश ठवकर, प्रा. समीर भेलावे यांनी सुद्धा ग्रंथदान केले.
ग्रामगीता महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच महाविद्यालयात ग्रंथालय विभाग असून या माध्यमातून आजी-माजी विद्यार्थ्यांना व परिसरातील वाचन प्रेमी जनतेला ग्रंथ देवाण-घेवणीचे कार्य करीत आहे. हे ग्रंथ देवाण-घेवाण अधिक प्रमाणात होऊन वाचन चळवळ बळकट होण्याच्या दृष्टीने चिमूर व परिसरातील जनतेला असे आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडील वाचून झालेली पुस्तके अडगळी मध्ये ठेवलेली असतात अथवा अनेक लोक पुस्तके जुनी झालीत, कुणी वाचत नाहीत म्हणून रद्दीमध्ये विकून टाकतात. अशी पुस्तके रद्दीमध्ये न विकता महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला दान करावी जेणेकरून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच मागेल त्याला ही पुस्तके वाचनासाठी ग्रंथालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येतील. आपण केलेल्या पुस्तकदानातून वाचकांच्या ज्ञानात भर पडेल तसेच वाचन चळवळ बळकटपणे रुजविण्यास मदत होईल. सतत वाचन केल्याने वाचक विवेकशील व प्रगल्भ होत असतो याची जाणीव वाचनप्रेमी जनतेनी ठेऊन आपल्याकडील वाचून झालेले पुस्तके रद्दीमध्ये न टाकता ती ग्रंथालयाला दान करावी असे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे..
Discussion about this post