
उदगीर / कमलाकर मुळे :
‘मैत्री’ प्रशिक्षणांमधून प्राप्त ज्ञान व कौशल्याचा वापर तरुणांनी पशुपालकांच्या उन्नतीसह स्वयंरोजगार निर्मितीसाठी करावा असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे संचालक, विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने यांनी केले. ते ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर; पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पशुप्रजनन व स्त्रीरोगशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे आयोजित ‘ग्रामीण भारतासाठी बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ’ (MAITRI) प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थींच्या प्रमाणपत्र वितरण व सांगता समारंभ कार्यक्रमात ऑनलाईन बोलत होते. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील तिसऱ्या प्रशिक्षण कार्यकमाचे आयोजन सोमवार दि. 3 मार्च 2025 रोजी करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोपाळ भारकड, डॉ. अनिल पाटील, प्रकल्प सह-समन्वयक हे उपस्थित होते.
डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये या प्रशिक्षणामध्ये घेण्यात आलेल्या विविध व्याख्यानासह प्रात्यक्षिकांबाबत सर्वाना अवगत केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमातून प्राप्त ज्ञानाचा पशुधन व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी वापर करावा. त्याचबरोबर महाविद्यालयातील तज्ञ मार्गदर्शकांसोबत जुळलेली नाळ तशीच कायमस्वरूपी ठेवून प्रत्यक्ष काम करत असताना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात असे मत डाॅ. गोपाळ भारकड यांनी केले. सोलापूर जिल्ह्यातील ३० सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले म्हणून त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रशिक्षणामधून मिळालेल्या ज्ञानाबाबत समाधान व आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, प्रशिक्षण सहसमन्वयक यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post