
छत्रपती संभाजीनगर :
पहाट फाउंडेशनतर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार 2025 हा यंदा अश्विनी लाठकर पानसरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांना प्रदान करण्यात आला. हा गौरव सोहळा थाटात संपन्न झाला, ज्यामध्ये शिक्षण व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी दशसूत्री अभियान, कॉपीमुक्त अभियान, स्वच्छता अभियान, माझी शाळा सुंदर शाळा अभियान, शिक्षक साहित्य संमेलन आदी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाजात शिक्षण विषयक रुची निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल पहाट फाउंडेशनच्या वतीने रेल्वे स्टेशन जवळील एका खाजगी हॉटेलमध्ये त्यांना हा कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.
पहाट फाउंडेशनचे संचालक अमोल बिलंगे, सोमनाथ चौधरी, अर्पिता सुरडकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक तथा व्याख्याते डॉ. संजय गायकवाड आणि डॉ. विवेक पानसरे यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. गायकवाड यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात नारीशक्तीच्या योगदानावर प्रकाश टाकला. “संरक्षण आणि देवत्वाच्या नावाखाली तिचे शोषण केले गेले. तथापि, तिच्या कर्तृत्वाने ती आज वेगवेगळ्या क्षेत्रात झेपावत आहे” असे कथन करत अश्विनी लाटकर यांची केलेली निवड अतिशय सार्थ आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
अश्विनीताई लाठकर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना संघर्षमय वाटचालीचा आढावा घेतला. प्राथमिक शिक्षण ते शिक्षणाधिकारी पदापर्यंतचा प्रवास उलगडत त्यांनी आपल्या कुटुंबाचे योगदान अधोरेखित केले. तद्वतच शिक्षण म्हणजे विशिष्ट कालखंडापूरती मर्यादित बाब नसून तहहयात शिकणे हेच खरे शिक्षण होय, असे प्रतिपादन त्यांनी केले. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असून आता यापुढेही पूर्ण क्षमतेने काम करेल हा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सन्मान सोहळ्यास शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फाउंडेशनचे संचालक अमोल भिलंगे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचलन अतुल घडमोडे यांनी केले, तर गणेश भुमे यांनी आभार प्रदर्शन केले..
Discussion about this post