मलिग्रे येथे जागतिक महिला दिना निमित्य विधवा महिलेचा सन्मान व सत्कार..
आजरा: प्रतिनिधी,
आजरा : आजरा तालुक्यातील मलिग्रे येथे संविधान संवर्धन चळवळ, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ,आम्ही भारतीय लोक अभियान, राष्ट्रमाता जिजाऊ संविधान गट, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट, मुक्ती संघर्ष समिती,महात्मा जोतिबा फुले विद्यामंदिर व अंगणवाडी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विधवा महिलेचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीच्या ओवीने मंगल कांबळे यांनी केली. संविधानाची प्रास्ताविका व पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक मनीषा सुतार यांनी केले.
यावेळी संविधान सन्मानासाठी महिलांच्या सन्मानासाठी, महिलांच्या न्याय हक्कासाठी या विषयावर संजय घाटगे, संग्राम सावंत, सरपंच शारदा गुरव व मंगलताई कांबळे या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. त्याचबरोबर शाळेतील सुकन्या बुगडे, दूर्वा कागिनकर व दुर्वा बुगडे या मुलींनी भाषणे केली. यावेळी शाळेच्या आवारामध्ये “आम्ही भारतीय लोक अभियान व मासूम संविधान फेलोशिप कार्यक्रम” अंतर्गत पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले होते. यामध्ये संविधानाच्या वेगवेगळ्या मूल्यांची माहिती देणारे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन शाळेच्या आवारात लावण्यात आले होते.
दरम्यान, महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धा पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले. यावेळी शितल बुगडे यांनी पती निधनानंतर सौभाग्यालंकार व सुहासिनीचा मान न सोडता कायम त्यांनी ठेवला. तसा ठराव गावामध्ये करण्यात आला. या क्रांतिकारी निर्णयाबद्दल त्यांचा महिला दिनाचे औचित्य साधून विशेष सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपसरपंच चाळू केंगारे, संविधान संवर्धन चळवळीचे कार्यकर्ते संग्राम सावंत, सदस्या शोभा जाधव, सुरेखा तर्डेकर, कल्पना बुगडे, महिला राज्यसत्ता आंदोलनाच्या नेत्या मंगलताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय घाटगे, बाळू कांबळे, शिवाजी भगुत्रे, संजय कांबळे,सचिन लोहार, महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनच्या राज्य सदस्या लक्ष्मी कांबळे, माजी सरपंच अशोक शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविता कागिनकर, उपाध्यक्षा पुजा पन्हाळकर, अंगणवाडी सेविका शशिकला घोरपडे, अपूर्वा देशपांडे, नंदा पवार व लोहार, मदतनीस नंदा बुगडे, शितल बुगडे व शोभा बुगडे यांच्यासह सविधान गटातील महिला व ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता शकुंतला बोरनाक यांच्या तुकोबारायांच्या अभंगाने झाली. आभार कल्पना कोरवी यांनी मानले.
Discussion about this post