
शिरूर तालुका प्रतिनिधी:-
शिरूर तालुका सहकारी खरेदी – विक्री संघाच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत माजी आमदार अशोक पवार समर्थकांची सरशी झाली. संघाच्या १७ पैकी १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, त्यातील दहा जागांवर आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके समर्थकांची वर्णी लागली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दहा – सात असे बलाबल दिसत असले तरी संघाच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत अनेक राजकीय व मोठ्या नाट्यमय घडामोडींची शक्यता आहे. शिरूर खरेदी – विक्री संघाच्या अध्यक्ष – उपाध्यक्ष पदासाठी घोडे बाजार होणार का..? अशा चर्चांना उधाण आले आहे. खरेदी – विक्री संघाच्या १७ पैकी बारा जागांवर रांजणगाव गटातून विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नरवडे, कारेगाव गटातून राहुल गवारे, न्हावरे गटातून नामदेव गिरमकर, पाबळ गटातून लहूजी थोरात, तळेगाव ढमढेरे गटातून गुलाब सातपुते, शिक्रापूर गटातून बाळासाहेब टेमगिरे, धामारी गटातून कानिफनाथ भरणे यांची तसेच अनुसूचित जाती जमाती गटातून विवेक सोनवणे, महिला प्रतिनिधी म्हणून मनिषा शेलार व सुजाता नरवडे, इतर मागास प्रवर्गातून संभाजी भुजबळ व भटक्या विमुक्त जाती गटातून शरद कालेवार यांची बिनविरोध निवड झाली होती. यापैकी दहा जागांवर आमदार कटके गटाने दावा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या जल्लोषात दहा संचालकांचा आमदार कटके यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस चे चिन्ह असलेल्या घड्याळाच्या पट्ट्या घालून सन्मान केला होता. उर्वरित पाच जागांसाठी आज चुरशीने निवडणूक झाली. आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक अरूण साकोरे यांनी निकाल जाहिर केले. त्यानूसार सोसायटी मतदार संघाच्या टाकळी हाजी गटातून महेंद्र सुरेश पाचर्णे हे २८ पैकी तब्बल १९ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रमोद दंडवते यांना केवळ नऊ मते मिळाली. मांडवगण फराटा व वडगाव रासाई गटात अत्यंत चुरस दिसून आली. तेथील उमेदवार केवळ एका मताने निवडून आले. मांडवगण गटातून संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नागवडे विजयी झाले. त्यांना १४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश साळुके यांना १३ मते मिळाली. वडगाव गटातून विजयी झालेले सुरेशचंद्र ढवळे यांना ११ तर त्यांचे प्रतिस्पर्धी शरद साठे यांना दहा मते मिळाली. वैयक्तिक सभासद मतदार संघाच्या दोन जागांवर सर्वाधिक ११३१ मते मिळवून संघाचे विद्यमान संचालक सर्जेराव दसगुडे व १११५ मते मिळवून नवनाथ ढमढेरे यांची वर्णी लागली. नितीन थोरात यांना पराभव पत्कराव लागला. त्यांना केवळ २२१ मते मिळाली. पाच जागांचे निकाल जाहिर झाल्यानंतर व या पाचही जागांवर विजय संपादन केल्याने माजी आमदार पवार समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून पाहिले गेल्यास सद्यस्थितीत शिरूर खरेदी – विक्री संघावर १० – ७ असे बलाबल दिसत असले आणि त्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत असल्याचे सिद्ध होत असले तरी खरेदी – विक्री संघाच्या अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडणूकीपर्यंत अनेक घडामोडी घडून विविध राजकीय नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अध्यक्ष – उपाध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना येत्या काही दिवसांत अत्यंत सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे.
Discussion about this post