
उदगीर (श्रीधर सावळे ) महिलांनी निर्भयपणे जगायला शिकले पाहिजे त्यासोबतच आपल्या हक्कांसाठी लढा उभारण्याची ताकद ठेवली पाहिजे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली गोडबोले पाटील यांनी केले. त्या जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणादायी व्याख्यान मलेत बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी महिलांनी निर्भय होऊन जीवन जगावे, अत्याचारांविरुद्ध लढावे आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा असे आवाहन केले. तसेच, महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. रेखा रमण रेड्डी या होत्या. आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलताना त्यांनी महिलांचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षण हे एक प्रभावी साधन असल्याचे सांगितले. स्त्री शिक्षित झाल्यास संपूर्ण कुटुंब सक्षम होते, आणि कामाच्या समान संधी उपलब्ध करून महिलांना आर्थिक सशक्तता मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड.एस.टी. पाटील चिघळीकर, सदस्य प्रशांत पेन्सलवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील, प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवनंदा रोडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पुजा जाजू यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Discussion about this post