
प्रतिनिधी किरण पाठक , अमळनेर
अमळनेर – तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे मागणी..
अमळनेर कामानिमित्त किंवा मजुरीनिमित बाहेरगावी स्थलांतरित झालेल्या मजुरांना लाभार्थी योजनेतून कमी करू नये अशी मागणी अमळनेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील अनेक गावातील कुंभार , वंजारी ,भिल्ल व पारधी समाजाचे मजूर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता दसऱ्यापासून वीट काम ,ऊसतोड ,मिल कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात परराज्यात अथवा परप्रांतात कुटुंबासह स्थलांतरीत झालेले आहेत. त्यामुळे हे नागरिक त्यांच्या लाभाचे धान्य घेण्यासाठी आले नाहीत आणि येऊ शकत नाहीत तसेच त्यांना केवायसी देखील करता आलेली नाही. हे नागरिक मजूर असल्याने त्यांना शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ओटीपी सुविधेवर देखील धान्य घेऊ शकले नाहीत. त्यामुळे हे कार्ड धारक धान्यापासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या सध्याच्या शोध मोहिमेत ३ ते ४ महिने कोणी धान्य घेतले नसल्यास त्यांची कार्ड प्रकार बदल करून त्यांना एनपीएच अथवा डिलीट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे कार्ड धारक अक्षय्य तृतीयेनंतर आपापल्या मूळ गावाला परत येतात. त्यांचा कामानिमित्त उदरनिर्वाहाचा कार्यकाळ पाच महिन्यांचा असल्याने अशा मजुरांच्या कार्ड धारकाची योजना बदल करू नये अथवा डिलीट मारू नये. वरील शोध मोहिमेत रिक्त जागांवर नव्या लाभार्थींची निवड करणे म्हणजे जुन्या बीपीएल किंवा ए ए आय लाभार्थ्यांना आपल्या लाभापासून वंचित ठेवणे होय. म्हणून शोध मोहिमे अंतर्गत सलेनेट आर सी शोधून त्यांना एनपीएच अथवा डिलीट करू नये अन्यथा भविष्यात दुकानदार आणि लाभार्थी यांच्यात वितुष्ट निर्माण होऊ शकते असे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर प्रवीण गोसावी , दिलीपकुमार सैनानी , विजय पाटील , वाल्मिक पाटील ,महेंद्र कोळी , बळीराम पाटील ,सुनील वाणी , आदित्य जैन , प्रशांत वायकर , भानुदास पाटील , भरत पवार , सुरेश बाविस्कर ,चेतन शिरसाठ ,महेंद्र चौधरी , सुभाष चौधरी यांच्या सह्या आहेत..
Discussion about this post