
श्री. रमेश राठोड..
आर्णी तालुक्यातील पाळोदी या गावांमधील शासकीय आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे पुणे–महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय हॅकॅथॉन स्पर्धा 2024-25 मध्ये यंदा पहिल्यांदाच एका आदिवासी आश्रमशाळेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा,पाळोदी येथील विद्यार्थ्यांनी अत्यंत दुर्गम भागात राहूनही आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या जोरावर राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला असून,त्यांची निवड आता राष्ट्रीय स्तरावर झाली आहे.ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी आयोजित केली जाते. यामध्ये विविध १५ विषयांवर प्रकल्प तयार करून राज्यस्तरीय फेरीत सादर केले जातात. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण १०६ प्रकल्प अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. या प्रतिष्ठित स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करत शासकीय आश्रमशाळा पाळोदीच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर वीज निर्मिती या संकल्पनेवर आधारित प्रकल्प सादर करून नव्या इतिहासाची नोंद केली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण संकल्पना या सावळी सदोबा या आदिवासी बहुल ग्रामीण भागातील शाळेत विजेची सुविधा नाही,मोबाईल नेटवर्कही अपुरा आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीतही येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर विजेच्या निर्मितीसाठी समृद्धी महामार्गाचा उपयोग करण्याची अभिनव संकल्पना मांडली.प्रकल्पाच्या प्रतिकृतीसह केलेल्या प्रभावी सादरीकरणामुळे त्यांनी राज्यस्तरीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.या ऐतिहासिक यशात मुख्याध्यापक श्री.सतीश सपकाळ यांचे मार्गदर्शन आणि प्रकल्प अधिकारी श्री.अमोल मेतकर यांचे सहकार्य मोलाचे ठरले. तसेच शिक्षक श्री.मंगेश सुरुसे व श्रीकांत राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या चमूतील विद्यार्थी हर्षद यशवंतराव शेळके आणि कार्तिक बाबाराव जाधव यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर शाळेच्या लौकिकात भर घातली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण शाळेचे तसेच विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. शासकीय आश्रमशाळा पाळोदीने आपल्या कर्तृत्वाने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा उत्कृष्ट प्रत्यय दिला असून, राष्ट्रीय स्तरावरही यश मिळवण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत..
Discussion about this post