
अमळनेर :
अहिराणी साहित्य परिषद धुळे आणि धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० व ३१ मार्च २०२५ रोजी पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन होणार आहे. सुमारे एका वर्षांपूर्वी अमळनेर येथे अत्यंत यशस्वी झालेल्या विद्रोही साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर अमळनेरकर रसिकांना खानदेशचे वैशिष्ट्य व गोडवा असलेल्या अहिराणी भाषेतून कथा, कविता, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रम यांची मेजवानी मिळणार आहे.
अमळनेर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे संमेलन संपन्न होणार असून खानदेश ची बोलीभाषा असलेल्या अहिराणीचा जागर या निमित्ताने होणार आहे. यानिमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजन समितीने माहिती देताना सांगितले की, खानदेशी संस्कृतीची झलक दाखवणारी ग्रंथदिंडी व शोभायात्रा, अहिराणी भाषेतून आपल्या खास शैलीतून व्यक्त होणाऱ्या वैविध्यपूर्ण कविता तसेच खानदेशचे वैशिष्ट्य असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी याचबरोबर अहिराणी बोली भाषेचे महत्त्व स्पष्ट करणारा परिसंवाद, खानदेशी लोक परंपरा व खानदेशी माणसाचे स्वभाव वैशिष्ट्य टिपणाऱ्या दर्जेदार कथा त्याचप्रमाणे संपूर्ण जगभर डंका वाजविणारे अहिराणी गाणी नृत्य आदींचा समावेश या अहिराणी साहित्य संमेलनात केला जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील यांनी सांगितले.
यानिमित्ताने अहिराणी साहित्यक्षेत्रात सेवा देणाऱ्या नामवंत साहित्यिकांना ‘अहिराणी भूषण पुरस्कार’ तर आहे अहिराणी प्रचार प्रसार करणाऱ्या कलाकारांना ‘अहिराणी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी सांगितले. अमळनेर आत मागील वर्षी मातृभाषा मराठीचा यशस्वी जागर झाल्यानंतर यंदाच्या वर्षी अमळनेरकर मायबोली अहिराणीचा जागर करतील असे आयोजन समितीतील अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी सांगितले.
अहिराणी भाषेचा विस्तार महाराष्ट्रा पलीकडे देखील होत असून या निमित्ताने अहिराणी भाषेचा शब्दकोश तयार करणारे डॉ. रमेश सूर्यवंशी, ‘ताई मी कलेक्टर व्हयनु’ सारख्या पुस्तकातून व्यक्त होणारे आयएएस अधिकारी राजेश पाटील यासह अहिराणीत साहित्य निर्माण करणारे मान्यवर साहित्यिक व सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे अहिराणीचा प्रचार प्रसार करणारे कलाकार व त्यांच्या कला या निमित्ताने अंमळनेरकरांना अनुभवायला मिळणार आहेत असे धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रा. डी डी पाटील यांनी सांगितले.
अमळनेरात राज्यस्तरीय अहिराणी संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांच्यावतीने आयोजन समितीचे अभिनंदन करण्यात आले तसेच करण्यासाठी पत्रकार संघटना समिती बरोबर असेल असे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष यांनी यावेळी सांगितले.
३० मार्च रोजी मराठी नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा असून याच दिवशी सायंकाळी चार वाजता या संमेलनाला सुरुवात होईल. ३१ मार्च रोजी देखील ईद निमित्त सुट्टी असून या दोन्ही दिवशी सहपरिवार जास्तीत जास्त रसिकांनी या संमेलनाचा आनंद घ्यावा असे आवाहन अहिराणी साहित्य परिषद धुळेचे अध्यक्ष भगवान पाटील, सचिव प्रभाकर शेळके यांनी केले आहे.
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राबणारे आयोजन समितीतील धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष के. डी. पाटील ,युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार, प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे,सौ.वसुंधराताई लांडगे, गोकुळ बागुल, डॉ कुणाल पवार, डॉ. दत्ता ठाकरे ,अजिंक्य चिखलोदकर आदीं पत्रकार परिषदेस उपस्थित होते..
Discussion about this post