अपंगत्त्व म्हटले की अनेक अडचणींचा सामना करणे आलेच. पण त्यामुळे खचून न जाता यावरही मात करीत निश्चित केलेले ध्येय प गाठण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने मेहनत घेणाऱ्यांना यश निश्चित येते, हेच तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील वैष्णवी नागनाथ बुधभाते हिने दाखवून दिले.
८० टक्के अंधत्त्व असतानाही खचून न जाता तिने चिकाटीने अभ्यास करीत तलाठी पदाला गवसणी घातली असून, क्लास वन अधिकारी होण्याचे आपले स्वप्न असल्याचे तिने सांगितले.
धनगरवाडी येथील वैष्णवी दुधभाते चौथीच्या वर्गात असतानाच अचानक तिची दृष्टी गेली. यात ती जवळपास ८० टक्के अपंग झाली. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तिला दिसत नव्हते, हे लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी पहिल्या रांगेत बसविले. तरीही तिला दिसायला अडचण येत होती. यामुळे शिक्षकांनी शिकविलेले ती लक्ष देऊन ऐकायची, श्रवण करायची, यावरच तिने अणदूर येथील जवाहर विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
वडील शेतकरी, आई गृहिणी. मुलीची दृष्टी गेल्याने घरातील किडुमिडूक विकून तिच्यावर उपचार शोधले. देशाच्या कानाकोपऱ्यात वैष्णवीला घेऊन गेले, पण तिच्यावर उपचार झाला नाही. उलट सध्या असलेली वीस टक्के दृष्टीही कालांतराने जाऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले, त्यामुळे वैष्णवीचे आई-वडील हवालदिल झाले. दरम्यान, जीवनात यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते.
रडत व हतबल होण्यापेक्षा आपण आपल्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा निर्धार वैष्णवीने केला. दहावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण तिने लातूर येथे घेतले. यासाठी मोठे बहिरवक्र काचेचे भिंग, विशिष्ठ प्रकारचे लँप वापरून जिद्द, चिकाटीने अभ्यास केला.
यानंतर तलाठी पदाची परीक्षा देत यातही तिने घवघवीत यश मिळविले, ती ऑगस्ट महिन्यात अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ या गावात तलाठी पदावर रुजू झाली आहे.
धनधाकट व्यक्तीलाही लाजवेल असे यश वैष्णवीने मिळविले आहे. अपंगत्व असले तरी ध्येय गाठण्यासाठी शारीरिक मजबुतीपेक्षा मानसिक मजबूती जास्त गरजेची असते, हेच वैष्णवीने दाखवून दिले आहे. पुढेही स्पर्धा परीक्षा देऊन वरिष्ठ अधिकारी होणार असल्याचे वैष्णवी दुधभाते हिने सारथी महाराष्ट्राशी बोलताना सांगितले.
प्रतिनिधि : संतोष पवार
Discussion about this post