जातेगांव येथे नागरिकांचे आरोग्य धोक्यात साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी डासांचा उद्रेक
नांदगाव (नाशिक) प्रतिनिधी:-
नांदगाव तालुक्यातील जातेगाव दलित वस्तीत व गावात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचल्यामुळे येथील रहिवासी नागरिकांचे प्रचंड हाल होत असून साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या भागात डासांनी मोठ्या प्रमाणात उद्रेक केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, येथील दलित वस्तीतील चंद्रभान आसाराम लाठे, संदीप लाठे, बाळू तुकाराम लाठे, नवनाथ सोनवणे,शरद त्रिभुवन,विलास लाठे यांच्या घरासमोर व इतर ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचल्यामुळे येथील रहिवासी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या भागात डासांनी मोठ्या प्रमाणात उद्रेक केला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून मलेरिया, टायफाईड, डेंग्यू, डायरिया इत्यादी साथीच्या आजार डोकेवर काढू शकतो. तसेच त्वचा आजारांचे संसर्ग पसरण्याची दाट शक्यता आहे.
तरी जातेगाव ग्रामपालीकेने याकडे वेळीच लक्ष घालून आवश्यकता असेल अशा ठिकाणी पाणी साचू नये म्हणून मुरुम टाकावा, सांडपाण्याच्या गटारी मैल्याने तुडुंब भरल्या असुन त्यातील मैला काढून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी. गावात अनेक ठिकाणी गवत वाढलेले आहे. त्यावर औषधांची फवारणी करावी त्याच प्रमाणे डास निर्मुलन मोहीम राबविण्यात यावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Discussion about this post