मानवत प्रतिनिधी :- मानवत येथे शिवजयंती निमित्त सारथी फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिरसलग पाचव्या वर्षी सामाजिक उपक्रमात उल्लेखनीय प्रतिसाद; दीडशेहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी मानवत येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सारथी फाउंडेशनतर्फे सलग पाचव्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिक, महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.रक्तदान शिबिराचे उद्घाटन केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरते, असे प्रतिपादन केले.सदर रक्तसंकलन शिबिर परभणी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या रक्तसंचलन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने पार पडले. शिबिरात कार्यरत वैद्यकीय पथकात डॉ. मोनिका खिल्लारे, विठ्ठल शिंदे, आत्माराम जटाळे, अनिल सावंत व शेख रिजवान यांनी मोलाची सेवा बजावली.यावर्षीच्या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांचा वाढता सहभाग होय. डॉ. मनीषा दगडू, कीर्ती कत्रुवार यांच्यासह अनेक महिलांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच पोलीस कर्मचारी वड साहेब, नारायण सोळंके यांच्यासह इतर पाच ते सात जणांनीही रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.दुपारी तीन वाजेपर्यंत जवळपास दीडशेहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून सारथी फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.शिवजयंतीनिमित्त केवळ उत्सव साजरा न करता समाजोपयोगी उपक्रम राबवून सारथी फाउंडेशनने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.










