महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते महापालिकेत सत्कार; आयुक्त सत्यम गांधी व उपमहापौर गजानन मगदूम यांची प्रमुख उपस्थिती
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामध्ये क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. स्नेहांकिता वरुटे यांनी राज्यस्तरीय रायफल आणि पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्णपदक (Gold Medal) पटकावून महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल महानगरपालिका मुख्यालयामध्ये महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि आयुक्त श्री. सत्यम गांधी व उपमहापौर श्री. गजानन मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला.शांतिनिकेतन लोकविद्यापीठ, सांगली येथे ही राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. यामध्ये सौ. स्नेहांकिता वरुटे यांनी अत्यंत अचूक निशाणा साधत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे त्या आता पुढील ‘ओपन नॅशनल स्पर्धा निवड चाचणी’ (Open National Trials) साठी पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाने क्रीडा क्षेत्रात सांगली शहराचे नाव पुन्हा एकदा राज्य पातळीवर झळकले आहे.यावेळी सत्कार प्रसंगी महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले की,”महानगरपालिकेत क्रीडा प्रशासनाची जबाबदारी सांभाळत असताना स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून सुवर्णपदक जिंकणे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. स्नेहांकिता वरुटे यांचा हा विजय महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांसाठी आणि क्रीडाप्रेमी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.” आयुक्त श्री. सत्यम गांधी यांनी त्यांचे अभिनंदन करताना सांगितले की,प्रशासकीय कामाचा व्याप सांभाळून राष्ट्रीय स्तराच्या दिशेने झेप घेणे कौतुकास्पद आहे. महानगरपालिका प्रशासन त्यांना पुढील वाटचालीस पूर्ण सहकार्य करेल. या गौरव सोहळ्याप्रसंगी पदाधिकारी , विविध समितीचे सदस्य, सर्व नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, महापालिका सचिव आणि इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात सौ. वरुटे यांचे अभिनंदन केले.सौ. स्नेहांकिता वरुटे यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबिय आणि महानगरपालिका प्रशासनाच्या पाठबळाला दिले असून, आगामी राष्ट्रीय निवड चाचणीतही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.










