कन्नड | प्रतिनिधी
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर येथील बाजारपेठेतील एका देशी दारू दुकानाबाहेर नादरपूर येथील भाऊसाहेब किसन निकम या तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दारू दुकानांबाबत प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणाने अतिमद्यपान केल्यानंतर नालीत पडल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या देशी दारू दुकानामुळे परिसरात वारंवार गोंधळ, मद्यधुंद व्यक्तींचा वावर आणि नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. विशेषतः महिलांनी अनेक वेळा प्रशासनाकडे दारू दुकानाविरोधात तक्रारी दिल्याचा दावा करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी दत्तू लोखंडे व विजय भोटकर करत आहेत.
दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


