आजरा | प्रतिनिधी | दि. ८ जून २०२६
आजरा शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले असून काही ठिकाणी कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, रस्त्यांची कामे पूर्ण होत असताना गटारी तुंबल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून संतप्त नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तातडीने गटारी साफ करण्याची मागणी केली आहे.
रस्ते कामादरम्यान झालेल्या खोदाईतील माती, दगड आणि इतर साहित्य गटारींमध्ये पडल्याने शहरातील अनेक गटारी पूर्णपणे चोक-अप झाल्या आहेत. दि. ६ जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे या समस्येची तीव्रता वाढली असून सांडपाणी आणि पावसाचे पाणी मुख्य रस्त्यांवरून वाहू लागले आहे. परिणामी रस्ते चिखलमय झाले असून नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सांडपाणी रस्त्यावर आल्याने अनेक भागांत दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या समस्येबाबत यापूर्वीच ‘अन्याय निवारण समिती’च्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आजरा येथील उपअभियंता आणि आजरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून गटारींची तातडीने साफसफाई करून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी दि. ८ जून रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी नगरसेवकांनी तुंबलेल्या गटारींची तातडीने साफसफाई, रस्त्यांवर पडून असलेली खडी, माती आणि इतर साहित्य हटविणे तसेच रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित व सुलभ करण्याची मागणी केली.
यावेळी नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी), अभिषेक शिंपी, परेश पोतदार, मुसा सरफराज पटेल, निसार लाडजी, आसिफ सोनेखान, विक्रम पटेकर तसेच माजी नगरसेवक किरण कांबळे, आरिफ खेडेकर आणि गौरव देशपांडे उपस्थित होते.
नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला तातडीने सूचना देण्यात आल्याचे सांगितले. रस्त्यांवरील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्यात येतील तसेच सर्व तुंबलेल्या गटारी युद्धपातळीवर साफ करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आता प्रत्यक्षात किती वेगाने आणि प्रभावीपणे कारवाई होते, याकडे आजरा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




