श्रीगोंदा, प्रतिनिधी: अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागासह विविध शासकीय पदांवर आपल्या कडक व धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विशेष मोहिमेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अन्नपदार्थातील भेसळ, नियमभंग आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या घटकांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मोहिमेंतर्गत पनीरच्या नावाखाली अनालॉग चीज विक्री, मुदत संपलेले अन्नपदार्थ बाजारात विकणे तसेच स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेल व अन्नव्यवसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता थेट छापे टाकले जात असल्याने अनेक ठिकाणी परवाने रद्द करण्यात आले असून काही दुकाने सील करण्यात आल्याचे समजते.
या कठोर कारवाईमुळे व्यापारी वर्गात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून या मोहिमेचे उत्स्फूर्त स्वागत होत असून ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर अशीच कारवाई व्हावी, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने उपस्थित होणाऱ्या शंका दूर करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. बाजारात दर्जेदार व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
