भोकरदन प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडकी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी बैलगाडी प्रवेशोत्सव रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि विविध शैक्षणिक घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले.
“मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण”, “आधी शिक्षण बाळाला मग जाईल कामाला” अशा घोषणांनी प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे आणि पालकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश एडके, सरपंच निवृत्ती वानखेडे, उपाध्यक्ष शेख अस्लम, महिला मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक एस. बी. नेवार, विनोद वाघ, महेश देशमुख, अमोल गोरे, राजेंद्र भुजंग, बाबासाहेब जाधव व सविता दहिगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
