शहादा, दि. 17 (प्रतिनिधी) :
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून शहादा येथे पतंजली योग समितीच्या वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. 21 जून रोजी सकाळी 6 ते 7 या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य खुल्या शेडमध्ये पार पडणार आहे.
नंदुरबार जिल्हा पतंजली समितीच्या मार्गदर्शनाखाली शहादा पतंजली समितीच्या वतीने या शिबिराची तयारी सुरू असून शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योग शिबिरासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, राष्ट्रीयीकृत व खासगी बँक कर्मचारी, पतसंस्था कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट, जायंट्स ग्रुप तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
योगदिनानिमित्त शहादा शहरासह ग्रामीण भागातही योग संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी विविध शाळा, संस्था आणि न्यायालय परिसरातही योग वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे योगाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
“नियमित योग, प्राणायाम व ध्यानामुळे शरीर व मन निरोगी राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जीवनशैली सुधारते,” असे मत पतंजली समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी दि. 21 जून रोजी सकाळी 6 वाजता बाजार समितीच्या शेडमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
