विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व गणवेशाचे वाटप
तांभा / प्रतिनिधी
देवळी तालुक्यातील तांभा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी शाळा प्रवेश महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मोफत पुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
शिक्षण विभागाच्या नियमानुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका गांजरे मॅडम, बहादुरे सर, जगताप सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रमोद मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरित करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोफत शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला, तर पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळाली असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
