श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा–पेडगाव रोडलगत शेतात जाणाऱ्या जुन्या वहिवाट शेतरस्त्याचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या आदेशानुसार महसूल व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत संबंधित शेतरस्ता यशस्वीपणे खुला करण्यात आला.
ही कारवाई मंडळ अधिकारी जायभाय, तलाठी सुदर्शन साळवे आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल व्यवहारे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अर्जदार मीराताई शिंदे तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकारी, वादी–प्रतिवादी आणि ग्रामस्थ यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे हा वाद शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने सोडविण्यात यश आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंतचा वहिवाट रस्ता पुन्हा उपलब्ध झाला आहे.
महसूल, भूमी अभिलेख चळवळीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे शेतरस्ते मिळत असल्याचे सांगण्यात आले. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हक्काचा आणि न्यायाचा विजय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी सहकार्य करणाऱ्या महसूल विभाग, पोलीस प्रशासन, वादी–प्रतिवादी आणि ग्रामस्थांचे महाराष्ट्र राज्य महसूल भूमी अभिलेख चळवळीच्या वतीने आभार मानण्यात आले.
याप्रसंगी चळवळीचे दादासाहेब जंगले पाटील म्हणाले की, “राज्यातील शेवटच्या शेतकरी बांधवाला त्याच्या शेतापर्यंत कायदेशीर व दर्जेदार रस्ता मिळेपर्यंत आमचा संघर्ष, पाठपुरावा आणि जनजागृती सुरूच राहील.”
