
भोकर तालुका प्रतिनिधी राजकुमार पांचाळ (9657978196)
दि. 02 आक्टों. संपुर्ण देशात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली जाते. आणि तसा केंद्र व राज्य शासनाचा आदेशही आहे. लहानात लहान ग्राम पंचायत पासून तर मंत्रालया पर्येंत, सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये ईत्यादी सर्वच ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती सन्मानाने साजरी करणे सर्वांचे कर्तव्यच आहे. या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी सुध्दा जाहीर केली आहे.
असे असतांना मात्र भोकर तालुक्यातील रेणापूर हे गाव याला आज अपवाद ठरल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा शासनाचा आदेश असतांनाही त्या आदेशाची पायमल्ली करत आज ग्रामपंचायतीकडून जयंतीवर ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्याकडून बहिष्कार टाकण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचा अपमान करण्याची ही सार्वभौम भारतातील पहिलीच घटना असेल. या घटनेवरून रेणापुर ग्रामपंचायत ही नथुराम गोडसे प्रणीत आहे की काय असा संभ्रम नागरीकांमध्ये निर्माण होत आहे.
त्याचे असे झाले की, ग्राम पंचायत सदस्य असलेले डॉ. कैलास कानिंदे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीसाठी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाला गेले असता त्यांना ग्रामपंचायतीला ताळा लावून असलेला दिसला. त्यामुळं त्यांनी सेवकाकडे जयंतीविषयी चौकशी केली. सेवकाला अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे त्याची बोबडी वळली आणि त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरवात केली. त्या उत्तरामध्ये त्याने जयंती आत्ताच केली असल्याचे सांगीतले. जयंतीचे फोटो मागीतले असता त्याने दोन दिवसापासून गावातच नसलेल्या रोजगार सेवकाने त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढल्याचे पुर्णपणे खोटे सांगीतले. सेवकाला खोटे बोलण्याची काहीच गरज नव्हती परंतू त्याला बोलवता धनी दुसराच असल्याचे जाणवले. जयंती करण्याच्या वेळेत सेवक हा त्याच्या शेतात होता तर ग्रामसेवक झोपेतूनच उठला नसल्याचे असे फोनवरून समजले. सरपंच उपसरपंच व बाँडीला तर आज गांधी जयंती आहे हेच माहीती नव्हतं. डाँ. कानिंदे यांनी सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांची वाट पाहीली. तरीही ग्रामपंचायतीचा टाळा उघडला गेला नाही. शोकांतीका अशी आहे की, सर्वांना झोपेत ठेऊन सकाळी साडेसातच्या आगोदर झालेली गांधी जयंती त्यांच्या नशीबातच नव्हती असेच उपरोधीतपणे म्हणावे लागेल.
स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, गांधी जयंती, संविधान दिवस तसेच मुक्ती संग्राम दिवस अशा महत्वपुर्ण दिवशी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेण्याविषयी शासणाचे आदेश आहेत. मात्र रेणापुर येथील ग्रामपंचायतीकडून मागील एक ते दिड वर्षापासून ग्रामसभाच घेतली गेली नाही. ग्रामपंचायतीचा सर्व कारभार हा ग्रामसेवकाच्या घरून चालत असून वेळप्रसंगी सरपंच उपसरपंच ग्रामसेवकाच्या घरी बसून कोणताही निर्णय घेत असतात. अशा या निष्क्रिय व मनमानी करणाऱ्या ग्रामपंचायती विरूध्द तक्रार करूनही काही फायदा होत नाही. कारण या ग्रामपंचायतीला वरीष्ठांचाच वरदहस्त लाभला आहे.
डाँ. कानिंदे म्हणाले की, या एवढ्या मोठ्या महापुरूषाच्या जयंतीच्या अवमानाबध्दल जबाबदार कोण? भारतातील ही एकमेव ग्रामपंचायत नथुराम गोडसे प्रणित आहे का? या जाणिवपूर्वक केलेल्या चूकीवर वरीष्ठांकडून योग्य ती चौकशी व कार्यवाही होऊन प्रशासनाच्या बेजबाबदार कर्मचारी ग्रामसेवकास तडकाफडकी बडतर्फ करून या निष्क्रीय ग्रामपंचायतीवर बरखास्तीचे आदेश जारी करावेत असे निवेदन गावकऱ्यांकडून जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड यांना देणार असल्याचे सांगितले आहे.
Discussion about this post