सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी कृषी क्षेत्रामध्ये कृषी पूरक व्यवसाय व कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये अमाप संधी उपलब्ध असून या संधीचा फायदा शेतकरी बांधव आणि कृषी क्षेत्रातील युवा विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. यासाठी विविध प्रकल्प उभारणे त्या संदर्भातले प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठ आणि कृषी विभाग सहकार्य करत असल्याचे श्री. देशमुख म्हणाले.
पीएमएफएमई या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा देशात पहिल्या क्रमांकावर असून या योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणावर लघुउद्योग उभारणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
यामध्ये ३५ ते ४० टक्के अनुदान हे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत देण्यात येते. तसेच कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन आणि शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट स्थापना करून विविध कृषी पूरक उद्योगाकडे वळणे गरजेचे आहे.
यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून मोठ्या संख्येने उत्तम कृषी उद्योजक तयार होऊ शकतात.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे आयोजित रब्बी शेतकरी मेळावा आणि १०३ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर चे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. प्रकाश देशमुख बोलत होते.
या कार्यक्रमासाठी ईफको छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा व्यवस्थापक श्री.कलीम शेख, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.किशोर झाडे, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी चे सहाय्यक प्राध्यापक श्रीमती.प्रणिता मुळे, डॉ.आनंद मडके, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतुरकर, डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री.दादासाहेब शिंदे, श्री.पांडुरंग ईनामे, श्री.सुभाष यांना डापके यांच्यासोबत विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होतेयावेळी मार्गदर्शन करताना श्री.कलिम शेख म्हणाले की, नॅनो तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये खूप फायदेशीर ठरत असून ईफको द्वारे निर्मित नॅनो युरिया व नॅनो डीएपी यांचा खूप चांगला रिझल्ट दिसून येत असून याचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी फायदा करून घ्यावा.
तसेच डीएपी ला पर्याय म्हणून टीएसपी खते देखील उपलब्ध असून त्याचा देखील वापर शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमध्ये करावा.यावेळी रब्बी पीक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. किशोर झाडे म्हणाले की. रब्बी ज्वारी हे चांगले पीक असून याची लागवड शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. रब्बी ज्वारीची लागवड करत असताना कोरडवाहू साठी परभणी सुपर मोती, परभणी मोती या वाणांचा तर सिंचन व्यवस्था उपलब्ध असल्यास परभणी ज्योती या वाणाचा अवलंब करावा. तसेच हुरडा साठी फुले वसंत हे वाण खूप चांगले असून त्याचा शेतकरी बांधवांनी अवलंब करावा. ज्वारी पिकामध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यानंतर अधिक फायदा दिसून येतो ज्यामध्ये ज्वारी अधिक करडई ही आंतरपीक पद्धती घेतल्यास सरासरी १५ टक्के अधिक उत्पादन मिळू शकते.
तसेच हरभरा पिकांमध्ये बीडीएनजी ७९७ (आकाश), काबुली बीडीएनजी ७९८ तसेच फुले विक्रम या सुधारित व मर रोगाला प्रतिकारक्षम व चांगले उत्पादन क्षमता असलेल्या वाणांचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा. यासोबतच दोन्ही पिकांमध्ये बुरशीनाशक कीटकनाशक व जैविक यांची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. हरभरा पिकामध्ये बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर दिसून आलेला आहे. तसेच दोन्ही पिकांमध्ये सुरुवातीपासूनच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.अनिता जिंतूरकर यांनी शेळीपालन हा एक उत्कृष्ट कृषी पूरक व्यवसाय उद्योग असून शेतकरी बांधवांनी शेळीपालन व्यवसाय करावा असे बांधवांनी या कृषीपूरक व्यवसायाकडे वळण्याचा नक्की विचार करावा. यावेळी श्री.पांडुरंग इनामे, श्री.दादासाहेब शिंदे यांनी देखील शेतीतील त्यांचे अनुभव व सुधारित शेती पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अनंत मडके यांनी केले.
Discussion about this post