जयसिंगपूर / शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे येत्या ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता शहरातील नांदणी नाका येथे आगमन होणार आहे. या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील जनतेने पुतळ्याचे जंगी स्वागत करण्याचे आवाहन केले आहे.
पुतळा आगमन समारंभाची नियोजन बैठक आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत पार पडली.शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. या ठिकाणची सर्व कामे बहुतशिकरित्या पूर्ण झाले आहे. याच ठिकाणी शिवकालीन साहित्याचे संग्रहालय आणि वाचनालय देखील उभारले जाणार आहे. सध्या या कामांना वेग आला असून, अश्वारूढ पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
पुतळ्याचे शहरात आगमन झाल्यानंतर मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात येणार आहे. या मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे व पारंपारिक वाद्याचा वापर केला जाणार आहे. यड्रावकर चेंबर्स येथे झालेल्या बैठकीत यासंबंधी नियोजन केले. या बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस माजी नगराध्यक्ष असलम फरास यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मिरवणुकीच्या मार्गक्रमणाचे नियोजन सांगितले. मिरवणुकीसाठी शहराच्या प्रमुख मार्गांचा वापर होईल, असे त्यांनी सांगितले. मिरवणुकीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत, याची खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन शहरातील जनतेला व्हावे, या उद्देशाने शहरातील प्रमुख मार्गासह इतर मार्गावरही सदरची मिरवणूक काढण्यात येईल, त्या दृष्टीने शहरातील जनतेने आपाआपल्या परिसरात रांगोळी काढून व पुष्पवृष्टी करून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उत्साहात स्वागत करावे, असे आवाहनही आमदार यड्रावकर यांनी केले.या दिवशी आरोग्य व रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात येणार आहे. शिरोळ तालुक्यातील जनतेने या शिबिरात मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन रक्तदान करावे, व आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार यड्रावकर यांनी केले. या शिबिराच्या आयोजनासाठी सखोल नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या चार दशकांपासून जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेसाठी सतत प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे संपूर्ण शिरोळ तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवप्रेमी कार्यकर्त्यांच्या या मोठ्या यशामुळे त्यांच्यात विशेष आनंदाचे वातावरण आहे.यावेळी मिलिंद शिंदे, प्रकाश झेले, मिलिंद भिडे, सर्जेराव पवार, अभिजित भांदिगिरे, रवींद्र ताडे, सचिन डोंगरे, चंद्रकांत जाधव घुणकीकर, अशोक माळगे, आदम मुजावर, राजेंद्र दाईंगडे, राजू झेले, दादासो पाटील चिंचवाडकर, शैलेश आडके, सागर मादनाईक, बाळासाहेब वगरे, अभिजित पाटील यांनी आपली मते मांडली.या बैठकीत शितल गतारे, संभाजी मोरे, विठ्ठल मोरे, रमेश यळगुडकर, अर्जुन देशमुख, रमेश शिंदे, आलोक कडाळे, मिलिंद भिडे, रणजीत महाडिक, यांच्यासह सर्व समाजातील मान्यवर उपस्थित होते.
आभार बजरंग खामकर यांनी मानले.शहरात ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मिरवणुकीचे आयोजन शिवप्रेमींसाठी खास आकर्षण असून, त्या दिवशी जयसिंगपूरच्या वातावरणात शिवरायांच्या पराक्रमाची आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे.
Discussion about this post