
अलिबाग | प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील दिघोडी–शिर्डी साई पदयात्री पालखीचे चोंढी येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि “साई राम”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे चोंढी येथील वाहतूक पोलिसांनी पालखीचा मान राखत स्वतः पालखी खांद्यावर घेत पदयात्रेत सहभाग नोंदवला. “साई नामाचा गजर” करत त्यांनी भाविकांसोबत पदयात्रा केली. त्यांच्या या सेवाभावी सहभागाचे वारकरी आणि ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले.
पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कोळगाव येथील समाजसेविका संजना पाटील, चोंढीचे सरपंच पिट्या शेट गायकवाड तसेच दिलीप भोईर यांनी मोलाचे सहकार्य केले. वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत पाणी, अल्पोपहार आणि इतर सोयींची व्यवस्था केली. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा पालखी सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.
दिघोडी ते चोंढी परिसरात साई भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत असून, या पदयात्रेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.


