
भोकरदन | प्रतिनिधी
राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समृद्धी गार्डन लॉन्स, सिल्लोड रोड, भोकरदन येथे भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय योजनांशी संबंधित अर्ज, तक्रारी व प्रलंबित प्रकरणांवर जागेवरच कार्यवाही करण्यात येणार असून, नागरिकांच्या विविध शासकीय अडचणींचा तत्काळ निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विधानसभा मतदारसंघनिहाय या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिराला आमदार संतोष रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, उपविभागीय अधिकारी सुकेशिनी पगारे, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे (भोकरदन), तहसीलदार अविनाथ लोंढे (जाफ्राबाद) तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
प्रशासनाने शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. हे शिबिर नागरिकांना जलद, पारदर्शक आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

