सारथी महाराष्ट्राचा न्यूज | नाशिक
रामतीर्थ परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पटांगण येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला साजेसे व त्यांच्या कार्याची उंची दर्शविणारे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली. या घोषणेमुळे नाशिक जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदावरी नदीकाठी उभारलेल्या ऐतिहासिक घाटांच्या पुनरुज्जीवनाचे काम आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. या कामांसोबतच त्यांच्या ऐतिहासिक कार्याचे कायमस्वरूपी स्मरण व्हावे, या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सूचनेनुसार रविवारी (दि. १९) नाशिक सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.
यावेळी मंत्री महाजन यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. तसेच सध्या सुरू असलेल्या अहिल्यादेवी होळकर वाडा परिसरातील फरशी बसविण्याच्या कामासह इतर विकासकामांबाबतही आवश्यक सूचना देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
स्मारक उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नाशिक सकल धनगर समाजाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी विजय हाके, बापू शिंदे, हर्षद बुचडे, किरण थोरात, पार्थ मदने, समाधान बागल यांच्यासह सकल धनगर समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
