शहादा,दि.17(का.प्र.)
खान्देशची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या कानबाई मातेच्या तीन दिवसीय अखंड उत्सवाची सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तीमय वातावरणात विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली. आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीतही कौटुंबिक जिव्हाळा, आपुलकी आणि पारंपारिकता टिकवून ठेवणारा हा उत्सव शहादा शहरासह परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.
खान्देशात श्रावण महिन्यातील दुसऱ्या रविवारी कानबाई मातेच्या मूर्तीची स्थापना करण्याची प्राचीन परंपरा आहे. या उत्सवाची सुरुवात शनिवारी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवून आणि कौटुंबिक पूजनाने होते. त्यानंतर रविवारी मातेची विधीवत प्रतिष्ठापना करून रोट पूजन केले जाते व रात्रभर पारंपरिक गीते गाऊन जागरण केले जाते.विशेषतः नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या खान्देशातील जिल्ह्यांमध्ये कानबाई माता उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.नोकरी आणि व्यवसायानिमित्त परगावी गेलेले आप्तेष्ट, नातलग या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. शहादा शहरातील जुन्या वसाहतींसह विविध नवीन रहिवाशी भागांत नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने कानबाई मातेची स्थापना केली होती.सोमवारी सकाळी शहरातील विविध भागांतून सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. पारंपरिक वाद्यांसह डीजे व अन्य वाद्यांच्या गजरात, कानबाई मातेच्या गाण्यांवर महिला-पुरुष आणि बालकांनी ठेका धरत आनंद लुटला. मित्रपरिवार व आप्तेष्टांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकांनंतर भाविकांनी गोमाई नदीपात्रात मातेच्या मूर्तीचे विसर्जन केले. या तीन दिवसीय उत्सवामुळे संपूर्ण शहादा शहरात भक्तिमय व मांगल्याचे वातावरण पसरले होते.









