
पातूर :
पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अकोला व वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १८ ऑगस्ट रोजी संयुक्त कारवाईत रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या बिअर शॉपीला वाईन बारचा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांनी ६५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोड होऊन ३५ हजार रुपये देण्याचे ठरल्याचे सांगण्यात आले.
या प्रकारानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे १८ ऑगस्ट रोजी चान्नी पोलीस ठाण्यात ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.



