
धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी, युवक आणि महिलांसाठी कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे एकदिवसीय वराह पालन व पशुधन विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पशुसंवर्धन विभाग, धुळे; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शासकीय कृषी महाविद्यालय, धुळे; कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि अनुलोम संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेला पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील, अनुलोम प्रांत टीम प्रमुख धुळे श्री. उमेश पगार, श्री. राजेश पाटील, डॉ. नितीन सोनवणे, डॉ. धनराज चौधरी, श्री. विनोद माळी, श्री. स्वप्नील पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने कार्यशाळेत सहभागी झाले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. गिरीश पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करत पशुधन व्यवसायामध्ये वराह पालनाचे महत्त्व सांगितले. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकरीहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
श्री. उमेश पगार यांनी अनुलोम संस्थेच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. राजेश पाटील यांनी पशुपालकांनी अशा कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन उपलब्ध संधींचा लाभ घेत आर्थिक स्तर उंचावण्याचे आवाहन केले.
डॉ. पंकज पाटील यांनी शेतीसोबत पशुधनाचे महत्त्व अधोरेखित केले. कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
तांत्रिक सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन
कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात डॉ. नितीन सोनवणे यांनी शासकीय योजना, कर्ज व विमा सुविधा तसेच वराह पालनातील आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. धनराज चौधरी यांनी भारत आणि महाराष्ट्रातील वराह पालनाचे महत्त्व, उपलब्ध संधी, व्यवसायाच्या शक्यता तसेच वराह पालन करताना घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. धनराज चौधरी यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, धुळे; शासकीय कृषी महाविद्यालय, धुळे; कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि अनुलोम संस्था, धुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी, युवक आणि महिलांना वराह पालन व्यवसायातील तांत्रिक माहिती, शासकीय योजना आणि आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन मिळाले.
