शहादा,दि.७
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ अर्थात विद्याश्रम परिवाराच्या विविध शाखांच्या तीन दिवशीय संस्थास्तरीय कला महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मंडळाच्या सरदार पटेल सभागृहात सोमवारी उत्साहात संपन्न झाले.
सदर कार्यक्रम मंडळाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी संचालक नूहभाई नुरानी यांच्यासह विविध शाखांचे प्राचार्य उपस्थित होते. दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी मानले.यावेळी बोलताना संचालक नूहभाई नुरानी म्हणाले की, मंडळाने विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आपले भविष्य घडवणे हे स्वतःच्याच हातात असते.
त्यामुळे विद्यार्थी जीवनात अशा उपक्रमांतून स्वतःला सिद्ध करावे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीशभाई पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विद्याश्रम परिवाराचा हा संस्थास्तरीय कला महोत्सव दि. ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यात प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी, शिक्षण शास्त्र आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. महोत्सवासाठी ६०० हून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.या तीन दिवसांत चित्रकला, रांगोळी, मातीकाम, मेहंदी, वक्तृत्व, सुगम गायन, लोकगीत, मूकनाट्य, प्रहसन, नाट्य, लोकनृत्य आणि कर्मचाऱ्यांसाठी गायन स्पर्धा अशा विविध कलाप्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा महात्मा गांधी सभागृह, सर विश्वेश्वरय्या सभागृह व सरदार पटेल हॉल येथे पार पडतील. महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा दि. ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूरभाई पाटील यांच्यासह विविध शाखांचे प्राचार्य व मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे.













