रात्री १० वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात नेमके कोणते कामकाज? चार्ज दिला होता का, याचा खुलासा करण्याची BDOंकडे मागणी
लांजा : हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती लांजा यांनी चौकशीचे पत्र काढल्यानंतर ग्रामस्थांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चौकशीच्या कालावधीत हर्दखळे ग्रामपंचायतीच्या माजी ग्रामसेविका सौ. पडवळ या रात्री सुमारे १० वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे.
माजी ग्रामसेविका सध्या हर्दखळे ग्रामपंचायतीच्या सेवेत नसताना त्यांना ग्रामपंचायतीचा कोणताही चार्ज अथवा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता का? असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
जर माजी ग्रामसेविका सौ. पडवळ यांना हर्दखळे ग्रामपंचायतीचा कोणताही प्रभार देण्यात आला असेल, तर त्याबाबतचा अधिकृत आदेश ग्रामस्थांना दाखवावा आणि त्याची प्रमाणित प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यापूर्वी माहिती अधिकारांतर्गत काही कागदपत्रे मागूनही माहिती उपलब्ध झाली नव्हती अथवा अपूर्ण माहिती देण्यात आली होती. मात्र, चौकशीचे पत्र निघाल्यानंतर संबंधित कागदपत्रे उपलब्ध झाल्याने त्या कागदपत्रांमध्ये नंतर कोणतीही दुरुस्ती अथवा फेरफार करण्यात आला आहे का? याचीही तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चौकशीच्या काळातील उपस्थिती नोंदवही, कार्यालयीन डायरी, आवक-जावक रजिस्टर, संबंधित मूळ अभिलेख तसेच उपलब्ध असल्यास CCTV फुटेज तपासण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या सर्व बाबींवर ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती लांजा यांच्याकडे लेखी स्वरूपात खुलासा व चौकशीची मागणी केली आहे.
“आम्ही कोणावरही थेट आरोप करत नाही; मात्र चौकशी सुरू असताना रात्री उशिरापर्यंत माजी ग्रामसेविकेची कार्यालयातील उपस्थिती आणि त्याच काळात चौकशीशी संबंधित कागदपत्रांची उपलब्धता या बाबींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे,” अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
आता BDO कार्यालयाकडून याबाबत कोणता खुलासा केला जातो आणि चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे हर्दखळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.










