सालवा, ता. मौदा : ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सालवा येथील शिक्षक राजेश माणिकराव ढोके यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. या गौरवाबद्दल श्री साई सेवा शिक्षण मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साई सेवा शिक्षण मंडळाचे संस्थासंचालक तथा सचिव माननीय विजयराव कठाळकर साहेब होते. प्रमुख अतिथी प्राचार्य आर. आर. मोटघरे, पर्यवेक्षक एस. आर. पेंदाम तसेच शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री कुमार चेतन पाहुणे मंचावर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी विजयराव कठाळकर साहेब यांच्या हस्ते राजेश माणिकराव ढोके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराच्या वेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या यशाचे अभिनंदन केले. मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.









